सीमा महांगडे, मुंबई : नगरसेवक नसताना आणि प्रशासकाच्या कालावधीत २०२३ मध्ये मुंबई महानगरपालिकेत मुद्द्यावरून उलथापालथ झालेली दिसून आली. घोटाळ्याच्या मालिका आणि त्याचा तपास, नियमबाह्य कंत्राटांचा आरोप, बारगळलेले प्रकल्प, निधी वाटपातील गटबाजी या सगळ्यांवरून पालिका मुंबईकरांची की राजकीय पक्षांची हा प्रश्न उपस्थित झाला. २०२३ वर्षात वायू प्रदूषणाच्या समस्येने मुंबईकर हैराण झाले. उपाययोजना, त्यांची अंमलबजावणी करूनही पालिकेला वायू प्रदूषणावर हवे तसे नियंत्रण मिळविता आलेले नाही.
पालिकेची चौकशी
कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, अन्य प्रकल्पांच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप होत कॅगमार्फत चौकशीची मागणी झाली. पालिकेच्या दोन विभागांतील सुमारे २१४ कोटी ४८ लाख रुपयांची कामे निविदा न काढता देण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचीही ईडीमार्फत चौकशी झाली.
पालिका मुख्यालयात पालकमंत्र्यांचे कार्यालय:
मुंबई महानगरपालिकेच्या सुमारे सव्वाशे वर्षाच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्र्यांना महापालिका मुख्यालयामध्ये दालन व कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे मुंबईकरांसह पालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाच शिवाय पालिका प्रशासनासह पालकमंत्र्यांवर बरीच टीका झाली.
लोअर परळ पूल खुला :
लोअर परेल येथील डिलाइलरोड पुलाचे काम गेल्या पाच वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे तेथील स्थानिक हैराण झालेच होते; पण ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून यासाठी आंदोलनेही झाली. एवढेच काय यामुळे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर पालिकेकडून गुन्हाही दाखल करण्यात आला. पालिकेकडून लोअर परेलचा पूल खुला केल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला.
डीप क्लिनिंग मोहीम...चकाचक मुंबई :
मुंबई स्वच्छ करण्यासाठी मुख्यमंत्री एकनााथ शिंदे यांच्या सूचनेनुसार पालिकेने डीप क्लिनिंग मोहीम सुरू केली. याअंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यासोबत, कचरा, राडारोडा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्येक आठवड्यात सहभाग नोंदवला असून, लोकसहभागासाठी आवाहन केले आहे.
पालिकेची कंत्राटे वादात :
पालिकेची रस्ता, स्ट्रीट फर्निचर, सॅनिटरी नॅपकिन व्हेंडिंग मशीन कंत्राटांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंकडून आयुक्त आणि सरकारवर निशाणा साधण्यात आला. आयुक्तांना यासंदर्भातील पत्रे पाठवून आता एसीची लोकायुक्तांसमोर सुनावणीही ठेवण्यात आली आहे.
मराठी पाट्यांसाठी कारवाई :
दुकानावर मराठी नावाच्या पाट्या लागण्यासाठी पालिकेकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कारवाई हाती घेण्यात आली. प्रत्येक वॉर्डात पथकनिहाय पालिका अधिकारी प्रत्यक्ष भेटी देत असून, कारवाई करत आहेत. असे असले तरी याची कडक अंमलबाजवणी अपेक्षित आहे.
मलबार हिल जलाशयाचा वाद :
दक्षिण मुंबईतील मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा वाद या वर्षात चांगलाच पेटला. पर्यावरणवादी आणि पालिका अधिकारी यांच्यातील पुनर्बांधणी की डागडुजी हा वाद अजून मिटलेला नाही. आता तज्ज्ञ समितीच्या अहवालाकडे लक्ष लागले आहे.