Join us

यंदा गुडघाभर पाण्यातून चालावे लागणार नाही; ४७७ उपसा पंपांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2023 12:51 PM

पावसाळ्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत.

मुंबई : पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साठून नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे पालिकेने यंदा मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी यंत्रणा पावसाळ्यापूर्वीच तयार ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पावसाळ्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत. पाणी साचणाऱ्या ठिकाणी उपसा करणारे एकूण ४७७ पंप मुंबई शहर तसेच उपनगरांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा गुडघाभर पाण्यातून चालावे लागणार नाही. 

मुंबईतील सखल भागातील परिसरात नागरिकांना जोरदार पावसाचे पाणी साचण्यापासून दिलासा देण्यासाठी या पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे.  मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत दैनंदिन कामांमध्ये तसेच जीवनमानामध्ये कोणताही अडथळा येऊ नये, या उद्देशाने ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या सर्व कामांचा परिणाम येत्या पावसाळ्याच्या कालावधीत मुंबईकरांना परिणामकारक स्वरूपात दिसून येईल, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे. 

मुंबईत जेव्हा ताशी ५५ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडतो, तसेच समुद्राला या काळात भरती असते. अशा वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असते. तसेच या पंपाच्या ठिकाणी ऑपरेटर आणि मदतनीस असे मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. त्यासोबतच पंप गरजेच्या काळात योग्यरीत्या सुरू राहील, याची जबाबदारीही समन्वय अधिकारी म्हणून विभागातील सहायक अभियंत्यावर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्याच्या सूचनाही वरिष्ठ प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. सखल भागात २४ तास पंप सज्ज राहतील, हीदेखील जबाबदारी समन्वय अधिकाऱ्यांवर असणार आहे.

पाणी उपसा करणारे पंप कोणत्या भागात?शहर भागात एकूण १८७ पंप आहेत. पश्चिम उपनगरामध्ये एकूण १६६ पंप आणि पूर्व उपनगरामध्ये एकूण १२४ पंप आहेत. शहर भागात  सर्वाधिक २५ पंप आहेत, तर पश्चिम उपनगरात एफ दक्षिण विभागात ३२ पंप आहेत.

 पंप  योग्य पद्धतीने कार्यरत राहतील यासाठीची जबाबदारी विभागीय पातळीवर निश्चित करण्यात आली आहे. समन्वय अधिकारी हे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडे या पंपांच्या कामगिरीची माहिती वेळोवेळी देणार आहेत. उल्हास महाले, उपायुक्त (पायाभूत सुविधा)

पंप लावण्यात आलेले भाग कुलाबा गीता नगर, ओएनजीसी यलो गेट, गोल देऊळ (ग्रँट रोड), नाना चौक, हँकॉक ब्रीज, जिजामाता उद्यान (भायखळा), एअर फोर्स स्टेशन (कॉटन ग्रीन), सरदार हॉटेल (चिंचपोकळी), जिजामातानगर (अभ्युदयनगर), परळ पूर्व स्टेशन बाहेर, टाटा मिल कंपाऊंड (परळ), शिंदेवाडी कोर्ट (दादर), हिंदमाता, सेंट झेव्हियर्स उद्यान (परळ), प्रतीक्षानगर (सायन), वडाळा अग्निशमन केंदग्र (एंटॉप हिल), दादर टी. टी., भरणी नाका (वडाळा), करी रोड रेल्वे कल्वर्ट, महालक्ष्मी कल्वर्ट, धारावी कोळीवाडा, खार भुयारी मार्ग, साहित्य सहवास (कलानगर), चमडावाडी नाला (वांद्रे), बीकेसी मेट्रो स्टेशन (वांद्रे), गोळीबार आऊट फॉल (हंसबर्ग जंक्शन), विद्यानगरी मेट्रो स्टेशन (कलिना), एअर इंडिया रोड (सांताक्रूझ), भाभा हॉस्पिटल (वांद्रे), मिलन भुयारी मार्ग, जोगेश्वरी भुयारी मार्ग, खार भुयारी मार्ग, टीचर्स कॉलनी (अंधेरी), मोतीलालनगर (गोरेगाव), मालाड भुयारी मार्ग, पोयसर भुयारी मार्ग, नॅन्सी कॉलनी, शिंपोली (बोरिवली).

टॅग्स :मुंबई