Join us

यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची प्रतिक्रिया

By मनोहर कुंभेजकर | Published: July 29, 2024 6:29 PM

Piyush Goyal News: अर्थसंकल्प २०२४-२५ हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पाबाबत दिलासादायक वक्तव्य केले.  

- मनोहर कुंभेजकरमुंबई - अर्थसंकल्प २०२४-२५ हा विकसित भारताच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री व उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी अर्थसंकल्पाबाबत दिलासादायक वक्तव्य केले.  केंद्र शासनाने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सर्वत्र उलट-सुलट चर्चा होत आहे, अशावेळी उत्तर मुंबईच्या रहिवाशांसाठी या अर्थसंकल्पाची विस्तृत माहिती देण्यासाठी  विश्लेषण अर्थसंकल्प २०२४-२५ या जासमीन बँक्वेट, रघुलीला मॉल येथील कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. 

यंदाचा अर्थसंकल्पात ‘गरीब’, ‘महिला‘, ‘युवा’ आणि ‘अन्नदाता’ (शेतकरी) या प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा ठरला. हा अर्थसंकल्प केवळ ५ वर्ष सत्तेचे किंवा निवडणुकीचे उदीष्ट ठेवून बनवलेला नसून, हा देशाच्या विकासाचा प्रत्येक टप्पा लक्षात घेऊन, दीर्घकालीन उद्दीष्ट समोर ठेवून बनवला आहे. यामुळेच या अर्थसंकल्पात या राज्याला काही मिळाले नाही असे नाही यातील सर्व बाबी देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी आहेत, सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीनेच याची मांडणी केलेली आहे, असे गोयल यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रातील उत्पादकता-लवचिकता, रोजगार-कौशल्य, सर्वसमावेशक मानवी स्रोत त्यांचा विकास तसेच सामाजिक न्याय, उत्पादन-सेवा, शहर विकास, उर्जा सुरक्षा , पायाभूत सुविधा, कल्पकता, संशोधन -विकास आणि सर्व घटकांचे सक्षमीकरण आदी विषय या अर्थसंकल्पात अधोरेखीत असून त्यावर काम केले जाणार आहे, असेही गोयल म्हणाले. एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या विळख्यात असूनही, भारत विकासाच्या मार्गाने अग्रेसर होत आहे ही अपवादा‍त्मक बाब आहे, असे केंद्रीय मंत्री गोयल यांनी आपल्या विश्लेषणात सांगितले.

विश्लेषण अर्थसंकल्प २०२४-२५ या व्याख्यान कार्यक्रमास तब्बल दीड हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग दर्शवला होता. या कार्यक्रमात महिंद्रा कोटक म्युच्युअल फंडचे निलेश शाह यांनी सुद्धा सादरीकरण केले. 

यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, आमदार सुनील राणे, आमदार मनीषा चौधरी, विधान परिषदेचे सभागृह नेते प्रवीण दरेकर आणि उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश खणकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :पीयुष गोयलअर्थसंकल्प 2024केंद्रीय अर्थसंकल्प 2019मुंबई