मुंबई - नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच २४ ते २७ जानेवारी दरम्यान नवी मुंबई येथील वाशी येथील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या संमेलनाची ' मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती ' ही मध्यवर्ती संकल्पना आहे.
विश्व मराठी संमेलनामध्ये जगभरातील वेगवेगळ्या देशातून, भारतातील अन्य राज्यातून येणाऱ्या मराठी भाषिकांकडून आधुनिक तंत्रज्ञानात व डिजिटल क्षेत्रात , मराठी भाषेची व्याप्ती कशाप्रकारे वाढविता येईल, तसेच वैश्विक स्तरावर ज्ञानभाषा व तंत्रभाषा म्हणून मराठीचा विकास कसा करता येईल, यावर प्रामुख्याने विचारमंथन करण्यात येईल. या संमेलनातील चर्चेतून मराठी भाषेच्या वापराबाबत नवीन तांत्रिक ज्ञान प्राप्त झाल्यास मराठीतून दर्जेदार काम कमीत कमी वेळेत मदत होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
या तीन दिवसीय संमेलनात तंत्रज्ञान व डिजिटल साधनांमध्ये मराठी भाषा बजावत असलेली भूमिका यावर परिसंवाद, अभिजात मराठी वाड्यमाचे सादरीकरण, मराठीतून शिकलेल्या जगभरातील नामवंत मंडळींच्या मुलाखती, परदेशस्थ मराठी लेखकांचे अनुभव कथन, तरुण पिढीतील परदेशी अभ्यासकांची त्यांच्या सुरु असलेल्या अभ्यासासंबंधीची सादरीकरणे, राज्यातील भाषेची सद्य स्थिती, परदेशी विद्यापीठांतील मराठीच्या शिक्षणाची वर्तमान स्थिती , अन्य भाषिकांना मराठी शिकवताना येणाऱ्या अडचणी , त्यावरील मार्ग, इनव्हेस्टर मिटचे आयोजन, ज्ञानभाषा व तंत्रभाषेच्या अनुषंगाने मराठीचा विकास या विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.