मुंबई - लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरुन भाजप नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टिपण्णी केली होती. त्यावरुन, प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो याची जाणीव ठेवा, असा इशारा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चाकणकर दिला होता. त्यावर, मी त्यांना महत्त्व देत नाही, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे.
दरेकर यांनी पुण्यात शिरूर येथील क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात बोलताना वादग्रस्त टिपण्णी केली होती. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरिबांकडे पाहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष' आहे'. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीतून संताप व्यक्त होत आहे. मात्र, माझं वक्तव्य महिलांचा अपमान करणारं नव्हतं, ''माझे वक्तव्य नीट ऐकले तर त्याचा अर्थ कळेल पण हे दुसरं काही नाही तर वड्याचं तेल वांग्यावर काढायचा प्रकार आहे, कारण अशा वक्तव्यांमुळे त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते!', असे दरेकर यांनी म्हटले.
तसेच, थोबाड सगळ्यांना रंगवता येतं, अशा प्रकारचं अतिरेकी भाषण करणं योग्य नाही. भाजप हा गरीब, श्रमिक, उपेक्षित आणि समाजातील शेवटच्या घटकासाठी काम करतो. तर, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष धनदांडग्यांसाठी, प्रस्थापितांसाठी, मोठ्यांसाठी काम करतो. याप्रकारे रंगलेल्या गालाचा मुका घेण्याचा प्रयत्न करतो, असे मी म्हटलं होतं. त्यामध्ये, कुठेही महिलेचा संबंध नाही, असे दरेकर यांनी सांगितले.
काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर
प्रविण दरेकरजी, आपण विरोधी पक्षनेते आहात, विधानसभेच्या वरच्या सभागृहाचे नेते आहात, अभ्यासू आणि वैचारिकता असलेलं हे सभागृह आहे. मात्र, आपल्या वक्तव्यामुळे अभ्यासाचा आणि वैचारिकतेचा आपल्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसल्याचे रुपाली चाकणकर यांनी म्हटले. तसेच, आपल्या बोलण्यातून जी घाण टपकतेय, ती आपल्या वैचारिकतेची दरिद्रता दाखवतेय. ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. आपल्या पक्षाच्या काही नेत्या आहेत. बाहेर फिरताना आपण किती महिलांच्या कैवारी आहोत हे दाखवून देत आहेत. आज मला त्यांची किव येत आहे. अशा महिला ज्या पक्षात काम करत आहेत, त्या पक्षाचा हा विचार आहे. तुमच्या बोलण्यावरुन तुमची संस्कृती काय आहे ती समजली. प्रविण दरेकर ज्या प्रकराचे आपण वक्तव्य केलंय त्याबद्दल आपण महिलांची माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी महिला आघाडी, महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवू शकतो याची जाणीव आपण ठेवावी, असा थेट इशाराच चाकणकर यांनी दिला आहे.