शेखर पानसरे संगमनेर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात व भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे या दोघांतील राजकीय संघर्षाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत बांधणी सुरु केली आहे. दोघांच्याही मतदारसंघात एकमेकांचा प्रभाव असल्याने ते टोकाचा संघर्ष करणार की सौम्य भूमिका घेणार ही उत्सुकता आहे.
थोरात आणि विखे या नेत्यांमधील राजकीय हाडवैर राज्यभर परिचित आहे. यापूर्वी दोघेही काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यात तीव्र संघर्ष होता. आता तर विखे हे भाजपमध्ये असल्याने दोघेही उघडपणे विरोधक आहेत. थोरात यांचा संगमनेर व विखे यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघ एकमेकाला लागून आहेत. थोरातांच्या मतदारसंघात विखेंनी भाजपचे मेळावे घेतले आहेत. थोरात यांच्या विरोधात संगमनेरमध्ये सध्यातरी कुणीही प्रबळ विरोधक नाही. तेथे ऐन निवडणुकीतच विरोधी चेहरा समोर येतो. लोकसभा निवडणुकीत काहीही झाले तरी विधानसभेला या मतदारसंघात थोरात यांचेच वर्चस्व असते. गतवेळी शिवसेनेला तेथे राष्टÑवादीकडून उमेदवार आयात करावा लागला. यावेळी विखे यांच्या कुटुंबातील सदस्यच थोरात यांच्या विरोधात भाजपकडून रिंगणात उतरविला जाईल अशी चर्चा भाजपमधून सुरु झाली आहे. राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे किंवा त्यांच्या सूनबाई धनश्री यांच्या उमेदवारीचीही चर्चा आहे. मात्र, विखे परिवाराकडून अशी उमेदवारी केली जाईल ही शक्यता कमी आहे. ‘प्रस्थापित नव्हे तर सामान्य चेहराच थोरात यांच्या विरोधात मैदानात असेल’ असे जाहीर करत सुजय विखे यांनी या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.विखेंनी संगमनेरमध्ये लक्ष घातले तर थोरात हे विखे यांचा शिर्डी मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवतील. शिर्डीतून विखे यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने थोरात यांचे भाचे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे किंवा त्यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मैदानात उतरवले जाईल अशी चर्चा आहे. ऐनवेळी विखेंचे पारंपरिक विरोधक राजेंद्र पिपाडा यांनाही काँग्रेस गळाला लावू शकते. तसे झाल्यास विखे यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण होणार आहे. थोरात यांचा प्रभाव असलेली २६ गावे विखे यांच्या मतदारसंघात असल्याने थोरातांचा शिर्डी मतदारसंघात प्रभाव आहे.निवडणुकीत होता समझोतायापूर्वी कॉंग्रेसमध्ये असताना विखे-थोरात यांच्यात संघर्ष असला तरी निवडणुकीच्या काळात पक्षाशी बांधिलकी पाळत ते एकमेकाला मदत करण्याचे धोरण घेत होते. आज ते वेगवेगळ्या पक्षांत असल्याने एकमेकाच्या मतदारसंघांत आपल्या पक्षांची ताकद दाखविणे ही त्यांची राजकीय गरज आहे. त्यामुळे ते टोकाचा संघर्ष करणार की जुळवून घेणार? याबाबत उत्सुकता आहे.