सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला बेवारस आणि भंगारातील धूळ खात पडलेल्या चारचाकी आणि दुचाकी दिसून येतात. रस्त्याच्या कडेच्या बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्या बाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्या असल्याच्या पार्श्वभूमीवर आता आर उत्तर विभागाकडून रस्ते स्वच्छता उपक्रमांतर्गत या बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात येऊन लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये दहिसर विभागातील ५४ दोन चाकी, ३६ रिक्षा, २९ चारचाकी अशा एकूण ११९ वाहनांचा समावेश आहे. लिलाव संदर्भतील संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून या गाड्यांचा लिलाव करण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रस्ते स्वच्छता उपक्रमांतर्गत पालिका प्रशासनाकडून रस्त्याच्या कडेला अनेक दिवस एकाच जागी असलेल्या वाहनावर सगळ्यात आधी नोटीस लावली जाते. त्या नोटीशीला वाहनमालकांकडून ठराविक मुदतीत प्रतिसाद न मिळाल्यास ही बेवारस वाहने जप्त करण्यात येतात. बेवारस वाहनांचा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लिलाव करण्याची प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये अनेकदा जप्त करण्यात आलेल्या वाहनांपैकी काही वाहनांची नोंदणी राज्याबाहेर झालेली असू शकते किंवा काहींना राष्ट्रीयीकृत बॅंका व सहकारी बॅंका यांनी अर्थसहाय्य दिलेले असू शकते. वाहन ज्याच्या नावे तारण असेल, तसेच गाडी चोरीस गेली असे समजून विमा कंपन्यांनी देयक रक्कम चुकती केली असू शकते अशा अनेक शक्यता असतात. त्यामुळे या वाहनांबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार अथवा गहाण असे काही असल्यास त्याबाबत संबंधितांनी संपर्क करावा याकरीता आवाहनही करण्यात आले आहे. या बाबत कोणीही दावा न केल्यास या वाहनांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आर उत्तर विभागाच्या उपायुक्त भाग्यश्री कापसे यांच्या सूचनांनुसार दहिसरमधील बेवारस वाहनांवरील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
म्हणून बेवारस वाहनांवर कारवाई
मुंबईमध्ये अनधिकृत बांधकामांबरोबरच रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही मोठा आहे. अनेकदा एखाद्या गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या किंवा जुन्या झालेल्या गाड्या सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर सोडून दिल्या जातात. अशा बेवारस वाहनांमुळे रस्त्यावर अतिक्रमण होतेच, पण वाहतूक कोंडीही होते. तसेच या वाहनांच्या टपावर किंवा वाहनांमध्ये पाणी साचून त्यात डेंग्यू – हिवतापाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या गाड्या महिनोंमहिने एकाच जागी असल्यामुळे त्या ठिकाणचा कचराही सफाई कामगारांना काढता येत नाही. तसेच अशा वाहनांमध्ये किंवा त्याच्या आडून आणखी गुन्हेही घडू शकतात. त्यामुळे अशी वाहने महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलने खात्याद्वारे मुंबई महापालिका अधिनियम कलम ३१४ नुसार जप्त करण्यात येतात.
बेवारस आणि भांगार गाड्यांच्या जप्ती संदर्भातील मोहीम आम्ही वरिष्ठांच्या सूचनांनुसार हाती घेतली आहे. पोलीस प्रशासन, ट्राफिक पोलीस यांच्याशी समन्वय साधून सर्व प्रक्रिया पार पाडली जात आहे. शहर स्वच्छ व सुंदर दिसावे हा या मोहिमे मागचा उद्देश आहे. - नयनीश वेंगुर्लेकर, सहाय्यक आयुक्त, आर उत्तर विभाग