‘त्या’ लाचखोरांना पोलीस कोठडी
By admin | Published: November 4, 2014 10:20 PM2014-11-04T22:20:36+5:302014-11-04T22:20:36+5:30
अलिबाग येथील वायशेतचा तलाठी जनार्दन हाले याला ५ नोव्हेंबर, तर पेण तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमर ठमके याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे
अलिबाग : अलिबाग येथील वायशेतचा तलाठी जनार्दन हाले याला ५ नोव्हेंबर, तर पेण तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमर ठमके याला ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. पेणच्या तहसीलदार सुकेशिनी पगारे आणि निगुडकर याला अधिक चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (ता.५) बोलावले आहे.
सातबाराची नोंद करण्यासाठी वायशेतचा तलाठी हाले याने तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोड १० हजार रुपयांवर झाली. त्यानंतर सोमवारी त्याला आठ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडेल. हाले याला अलिबाग येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
दुसऱ्या प्रकरणात पेण तहसीलदार कार्यालयातील लिपिक अमर ठमके याने वडखळ येथील जमिनीला बिनशेती परवानगी देण्याकरिता स्वत:करिता पाच हजार रुपये आणि तहसीलदार पगारे यांच्यासाठी १० हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितल्याचे निष्पन्न झाले. तक्रारदाराने २३ जुलै २०१४ रोजी तक्रार दिली होती. वडखळ येथील वावे गावातील जमीन बिनशेती परवानगीसाठी तक्रारदाराने ११ मार्च २०१४ जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. त्यानुसार पेणच्या तहसीलदार पगारे यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली असता तेथे जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी आणलेली रेती, डबर ठेवल्याचे त्या ठिकाणी दिसून आले. त्यानंतर लिपिक ठमके याने तक्रारदाराला सुमारे ७८ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस दाखविली. नोटीस रद्द करण्यासाठी आणि बिनशेती परवानगीसाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली.