दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांना व्हावे लागणार क्वारंटाइन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 05:18 AM2021-11-28T05:18:19+5:302021-11-28T05:18:54+5:30
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगभर भीती निर्माण केली आहे. पुढील महिन्यात नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी ...
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगभर भीती निर्माण केली आहे. पुढील महिन्यात नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीसाठी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाइन करण्यात येणार आहे. तसेच त्यांची चाचणी करून ते नमुने जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात येणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता पूर्णपणे नियंत्रणात आला आहे. सध्या रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०२ टक्के एवढा आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही आता तीन हजारांहून कमी आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व निर्बंध शिथिल करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यात आले आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि इस्रायलमध्ये कोविडचा नवीन प्रकाराचे रुग्ण आढळल्यामुळे जगभर पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
युरोप, अमेरिका, दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोविडच्या नवीन प्रकाराची माहिती मागवण्याची विनंती महापालिकेने राज्य सरकारच्या टास्क फोर्सला केली आहे. या विषाणूची लक्षणे कोणती? उपचार काय? त्याचे परिणाम किती गंभीर असतील? याबाबत माहिती मागविण्यात येत आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला क्वारंटाइन करण्याचे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षित अंतर राखणे, मास्क वापरणे व नियमित हात धुण्याचे आवाहन करण्यात आले आहे.