Join us  

‘त्या’ नगरसेवकांना हायकोर्टाचा दणका

By admin | Published: December 02, 2015 4:17 AM

ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या ठाण्याच्या ४ नगरसेवकांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने

मुंबई : ठाण्याचे प्रसिद्ध बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या ठाण्याच्या ४ नगरसेवकांची अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. या चारही नगरसेवकांना शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तपास यंत्रणेपुढे शरण जाण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने दिला.काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे आणि अपक्ष सुधाकर चव्हाण यांनी बिल्डर सूरज परमार यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप पोलिसांनी ठेवला आहे. १२ आॅक्टोबर रोजी या चौघांवर एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हे चार नगरसेवक आणि ठाण्यातील काही बडे राजकीय नेते परमार यांच्याकडून सतत पैशांची मागणी करत. त्यांची मागणी अवास्तव असल्याने परमार यांनी आत्महत्या केली. पोलिसांकडून अटक केली जाईल, या भीतीने चारही नगरसेवकांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर होती.सगळ्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर व सरकारी वकिलांचे म्हणणे ऐकल्यानंतर न्या. गडकरी यांनी चौघांचीही अटकपूर्व जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. ‘गुन्ह्याची गंभीरता पाहता आणि अर्जदारांवर ठेवण्यात आलेले आरोप लक्षात घेता, त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहेत,’ असे न्या. गडकरी यांनी म्हटले.या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार की तपास यंत्रणेपुढे शरण जाणार? अशी विचारणा न्या. गडकरी यांनी चारही नगरसेवकांकडे केली. त्यावर न्यायालयीन कामकाजाच्या दुपारच्या सत्रात याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील शिरीष गुप्ते यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. ‘आम्ही अटकपूर्व जामीन मागे घेत आहोत, मात्र आम्हाला तपास यंत्रणेपुढे शरण जाण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत द्या,’ अशी विनंती अ‍ॅड. गुप्ते यांनी उच्च न्यायालयाला केली. त्यावर विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी केवळ गुरुवारपर्यंत मुदत द्यावी, अशी विनंती न्या. गडकरी यांना केली. अखेरीस न्या. गडकरी यांनी चौघांनाही शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत तपास यंत्रणेपुढे शरण जाण्याचे निर्देश दिले. मात्र दरम्यानच्या काळात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तपास यंत्रणेपुढे हजेरी लावण्याचेही निर्देश दिले. (प्रतिनिधी)काय आहे प्रकरण?सूरज परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी त्यांच्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली. नोटमध्ये नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण, विक्रांत चव्हाण व हनुमंत जगदाळे यांच्या नावाचा उल्लेख होता. कुटुंबीयांना त्रास होऊ नये, म्हणून परमार यांनी या चारही नगरसेवकांची नावे नोटमधून खोडली. पोलिसांनी केमिकल अ‍ॅनालायझरच्या मदतीने ही नावे शोधून काढली व संबंधितांवर एफआयआर दाखल केला होता.