Join us

‘त्या’ चौघांच्या मित्रांचे जाबजबाब सुरू

By admin | Published: June 28, 2015 2:27 AM

‘त्या’ चौघांच्या मित्रांचे जाबजबाब सुरू

मुंबई : काळाचौकीत चार मित्रांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी पोलीस कसून चौकशी करीत आहेत. तपासादरम्यान हे चौघे मित्र परळ येथील एमडी महाविद्यालयाच्या आवारात मजामस्तीसाठी एकत्र येत असल्याचे समोर आले आहे. याच परिसरातून काही धागेदोरे मिळविण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.काळाचौकी परिसरात ३१ मे ते ७ जूनदरम्यान एकामागोमाग एक चार मित्रांचा संशयास्पद मृत्यू झाला. यामध्ये चैतन्य परब (२०), प्रसाद धावडे (२१) या दोघांचा अपघाती मृत्यू झाला होता. तर दर्शन काटकर (२०) आणि प्रतीक तेजम (२७) या दोघांनी गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी चौघांनीही मोबाइलमधील डाटा (माहिती) डिलीट केल्यामुळे संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. हे गूढ उकलण्यासाठी चौघांच्या मोबाइलमधील डाटा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकरणी नातेवाइकांसह त्यांच्या मित्रमैत्रिणींचे जबाब नोंदविण्यात येत आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, मित्रमैत्रिणींच्या जबाबातून हे चौघे परळच्या एमडी कालेजजवळ भेटत, अशी माहिती समोर आली आहे. या अड्ड्यावरील आणखी काहींचे जबाब नोंदविण्याच्या प्रयत्नात पोलीस आहेत, असे समजते.