Join us  

‘त्या’ १३ गावांना मदत देणार

By admin | Published: March 22, 2015 10:25 PM

उरण परिसरातील केळवणे गाव आणि परिसरातील १३ गावांतील ३ हजार एकर भातशेतीत समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे शेतजमिनीत भातपीक निरुपयोगी ठरले आहे.

उरण : उरण परिसरातील केळवणे गाव आणि परिसरातील १३ गावांतील ३ हजार एकर भातशेतीत समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे शेतजमिनीत भातपीक निरुपयोगी ठरले आहे. याबाबत पालकमंत्र्यांनी दौऱ्यादरम्यान शेतजमिनीची पाहणी केली. गावकऱ्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. दुष्काळग्रस्तांच्या धर्तीवर समुद्राचे पाणी शिरलेल्या भातपीक नुकसानग्रस्तांनाही नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी उरण येथील जाहीर कार्यक्रमात दिले. शिवस्मारक युवा प्रतिष्ठान कळंबुसरे-उरण संस्थेने स्वखर्चाने उभारलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा जाहीर कार्यक्रम शनिवारी संध्याकाळी कळंबुसरे प्राथमिक शाळेच्या भव्य प्रांगणात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. या आयोजित कार्यक्रमास भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष रवी भोईर, माजी नगराध्यक्ष नितीन पाटील, उनपच्या उपनगराध्यक्षा सायली म्हात्रे, महिला व बालकल्याण समिती सभापती प्रियांका पाटील, नगरसेवक नवीन राजपाल, कळंबुसरे सरपंच सुशील राऊत, शिवस्मारक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रुपेश पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आगामी काळात रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट, जेएनपीटी कॉरिडॉर व इतर विविध योजनांवर हजारो कोटी रुपये खर्च होणार आहेत. उरण परिसरात खारभूमी विकसित करण्यासाठी निधी, नादुरुस्त विजेच्या खांबाची दुरुस्ती आणि अपुऱ्या सुविधांमुळे निरुपयोगी ठरलेल्या कोप्रोली येथील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती येत्या दोन महिन्यांत सुधारण्यात येईल, अशी ग्वाही रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर कार्यक्रमातून दिली.ग्रामीण भागातही थ्री-फेज कनेक्शन देण्याचा सरकारचा प्रयत्न असून परिसरात नादुरुस्त झालेले विद्युत खांब बदलल्याचे आणि पडझड झालेल्या कळंबुसरे प्राथमिक शाळेच्या दुरुस्ती करण्याचे कामही केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त करून येत्या दोन महिन्यांत आरोग्य केंद्र सुस्थितीत आणण्याचे काम करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (वार्ताहर)४ग्रामीण भागातही थ्री-फेज कनेक्शन देण्याचा प्रयत्न असून नादुरुस्त झालेले विद्युत खांब बदलल्याचे आणि पडझड झालेल्या कळंबुसरे प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्याचे कामही केले जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.