लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना प्रतिबंधक लसींमुळे रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होणार असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अतिजोखमीचे आजार असणाऱ्यांसाठी ही लस लाभदायी असणार आहे. मात्र कोरोनाखेरीज अन्य आजार असलेल्यांनी लसीचा डोस घेण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. शिवाय, त्याचप्रमाणे लस घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रकृतीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोरोनापासून बचाव व्हावा याकरता लसीच्या चाचण्यांमध्ये अद्यापही कर्करोगासारख्या गंभीर विकाराच्या रुग्णांना आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांचा यात समावेश करण्यात आलेला नाही, हे माहिती असणे गरजेचे आहे. लस अधिक प्रमाणात उपलब्ध झाल्यावर त्याचे फायदे आणि दुष्परिणाम याबद्दल माहिती मिळू शकेल. पण, लसीकरण करून घेतल्यानंतरही मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार हात धुणे याबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. दीपक वारंजे यांनी सांगितले.
कर्करोग रुग्ण अँड असोसिएशनचे स्त्रीरोगविषयक कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत न्याती यांनी सांगितले की, कर्करुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने कोरोनाचा सर्वाधिक धोका यांना होता. पण, आता कोरोना लस उपलब्ध झाल्यास कर्करुग्णांना याचा नक्कीच फायदा होईल. पण प्रत्येक रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार लस द्यायची की नाही हे ठरवले जाईल. मुळात, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी सुरू असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच लस टोचणे गरजेचे आहे. कारण, कर्करोग हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. त्याचप्रमाणे लसीमध्येही प्रकार आहेत. हे समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.