Join us  

...तर शिंदे गटाचे 'ते' आमदार भाजपात जाणं पसंत करतील; किशोरी पेडणेकरांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 1:43 PM

एकनाथ शिंदे हे मूळचे शिवसैनिक, परंतु आता मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची वागणूक यात जमीन आस्मानचा फरक आहे असं पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई - शिंदे गटातील सर्वच आमदार खुश आहेत असं नाही. अनेकजण दबावापोटी तिकडे गेले आहेत. परंतु भविष्यात त्यांना स्वत:ला वाचायचं आणि वाचवायचं असेल तर भाजपात जाण्याशिवाय पर्याय नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. यावेळी पेडणेकरांनी भाजपावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, एकनाथ शिंदे हे मूळचे शिवसैनिक, परंतु आता मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांची वागणूक यात जमीन आस्मानचा फरक आहे. ते कुणाची तरी स्क्रिप्ट वाचून दाखवतायेत का असा प्रश्न निर्माण होतो. हे मुख्यमंत्री स्वत:चं वाक्य बोलत नाही हे वारंवार दिसते. जुन्या कडीला ऊत आणून वातावरण अस्थिर करण्याचं कुठल्या पक्षाला हवं हे सर्वांना माहिती आहे. अशा शब्दात त्यांनी भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्त्र सोडलं आहे. 

तसेच आम्ही ग्रामपंचायतीचे खरे आकडे दाखवले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने त्यात बाजी मारली. उद्धव ठाकरेंचे विचार खोलवर रुजले आहेत. महाराष्ट्रात खोटं चित्र निर्माण केले जात आहे. त्यामुळे लोक अधिक चीडून उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत उभी राहत आहेत. सगळे खुश नक्कीच नाहीत. कोण दबावाला बळी पडले आहेत. केंद्रात भाजपाची सत्ता आहे. वाचायचं असेल तर ते भाजपात जाणं पसंत करतील.  शिंदे गटात जे कुणी नाराज असतील त्यांना अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील पक्षात जावं लागेल. भाजपा महाशक्ती असेल तर तर शिंदे गटाने त्यात विलीन व्हायला हवं. त्यांच्याकडे इतर पर्याय नाहीत असं त्यांनी म्हटलं. 

आमची नाळ लोकांशी जुळली आहेमनसे आमदार राजू पाटील यांनी आमची मनं जुळली, बाकी सर्व जुळेल असं सांगत मनसे-भाजपा-शिंदे गट महायुतीवर भाष्य केले होते. त्यावर किशोरी पेडणेकरांनी म्हटलं की, तुमची मनं जुळू द्या नाहीतर शरीर परंतु आमची नागरिकांची नाळ जुळली आहे. खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. घर फिरले की घराचे वासे फिरतात. ठाकरे घराण्यात पहिले वासे फिरले आणि आता घर फिरतंय. शिवसेनेने कधी दांभिकपणा केला नाही. खोट्याचा आधार घेऊन वागली नाही. मुंबई, पुणे आणि नागपूर या महापालिकेत फरत आहे. पुणे, नागपूर तुलनेत मुंबई महापालिका खूप चांगली आहे हे लोकांना कळतंय. ज्यांना जे काही साध्य करायचं ते निघून गेलेत. काही आमदार मनाने नाही गेले ते पुन्हा आले तर त्यांच्याबाबत पक्षप्रमुख निर्णय घेतील. त्यामुळे त्यांच्या आमदारांमध्ये काही फाटलं किंवा चिटकलं यावर आम्हाला काही देणघेणे नाही असं सांगत महायुतीच्या चर्चेवर किशोरी पेडणेकरांनी प्रहार केले. 

राज्यपालांबाबत सोशल मीडियात खूप काही व्हायरलमहाराष्ट्राने इतके राज्यपाल पाहिले पण आत्ताच्या राज्यपालांचे वागणे पाहिले तर त्यांच्याबद्दल सोशल मीडियात खूप गोष्टी फिरतात. त्यांच्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. संविधानात व्यक्ती नव्हे तर पद मोठे असते. राज्यपालांचे तसेच आहे. त्यांच्या हातात जे काही काम होते त्यांनी केले नाही असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. तसेच रवी राणा, नवनीत राणा हे नौटंकीबाज आहेत. त्यांना त्यांच्याच भाषेत बच्चू कडू यांनी उत्तर दिले. आपली वेगळी छाप निर्माण करण्याचा प्रयत्न राणा दाम्पत्य करतात. परंतु ते यशस्वी होत नाहीत. त्यात आता बच्चू कडू यांनी छातीठोकपणे मैदानात उतरण्याचं आव्हान दिले आहे असंही पेडणेकर यांनी सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :किशोरी पेडणेकरशिवसेनाभाजपाएकनाथ शिंदे