Join us  

‘ते’ नऊ मृत्यू गोवरामुळेच, दोन प्रौढांसह आणखी २४ जणांना बाधा, पण धोका नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 2:03 PM

एका मृत्यूबाबत संशय कायम आहे. त्यामुळे गोवराने आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोवरमुळे प्राणवायूवर उपचार घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले. गेल्या आठवड्यात ही संख्या नऊ होती. आता ती २६ झाली आहे. 

मुंबई: गोवराच्या साथीने मुंबईभोवतालचा विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी आणखी २४ जणांना गोवर झाल्याचे निदान करण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांत जे नऊ मृत्यू संशयित म्हणून सांगितले जात होते, त्या सर्वांचाच गोवरामुळे मृत्यू झाल्याचे मुंबई महापालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

एका मृत्यूबाबत संशय कायम आहे. त्यामुळे गोवराने आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू झाला आहे. तसेच गोवरमुळे प्राणवायूवर उपचार घेणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे निदर्शनास आले. गेल्या आठवड्यात ही संख्या नऊ होती. आता ती २६ झाली आहे. 

गोवर आजाराच्या अनुषंगाने सर्वेक्षण, लसीकरण आणि जनजागृती या तीन गोष्टींवर मोठ्या प्रमाणात गोवर प्रभावित क्षेत्रात भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या त्यांच्या मोहिमेत खासगी डॉक्टरांनी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. गोवंडी येथील काही ठिकाणी बालकांचे लसीकरण आणि ‘अ’ जीवनसत्त्व औषधाचे डोस या डॉक्टरांकडून पाजण्यात येत आहे. 

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ते ३ प्रौढांमध्ये गोवरसदृश लक्षणे जाणवत असली, तरी त्यांच्यावर लक्षणाप्रमाणे उपचार देण्याचे काम करण्यात आले आहे. या आजारात प्रौढांना कोणताही धोका नाही. त्याचप्रमाणे प्रौढांसाठी या क्षणाला तरी कोणती प्रतिबंधक लस द्यावी, याच्या मार्गदर्शक सूचना किंवा कोणती योजना नाही. -  व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण - १-  ऑक्सिजनवर उपचार घेत असलेले रुग्ण - २६ -  जनरल बेड्सवरील रुग्ण - ६७ -  मुंबईतील आज केलेल्या एकूण घरांचे सर्वेक्षण - ३,०८,३२७ -  आज सापडलेले ताप आणि पुरळचे रुग्ण - १७२ 

टॅग्स :मुंबईआरोग्य