‘ते’ अधिकारी आणखी गोत्यात; जी पेद्वारे लाच घेणाऱ्या कस्टम अधिकाऱ्यांवर तीन गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:17 AM2023-03-13T06:17:11+5:302023-03-13T06:17:51+5:30
या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.
आशिष सिंह, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:मुंबईविमानतळावर जी पेद्वारे कस्टम अधिकाऱ्यांनी लाच उकळल्याप्रकरणी सीबीआयने एकाच दिवसात तीन गुन्हे दाखल केले असून या प्रकरणातील मास्टरमाइंडचा शोध सुरू आहे. या प्रकरणात अनेक उच्चपदस्थ अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहेत.
विमानतळावर जी पेद्वारे लाच उकळण्याच्या पाच प्रकरणांचा तपास करणाऱ्या सीबीआयने एकामागोमाग दाखल केलेल्या या आणखी तीन प्रकरणात कस्टम अधीक्षक, लोडर यांचा सहभाग स्पष्ट झाला आहे. हे अधिकारी प्रवाशांना धमकावून पासपोर्ट हिसकावून घेत आणि त्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत जी पेद्वारे रक्कम उकळीत. अथवा प्रवाशांच्या नातेवाईकांकडून रक्कम मागवून त्यानंतरच प्रवाशांची सुटका केली जाई.
सीबीआयने १० मार्च रोजी विमानतळावर जे तीन गुन्हे दाखल केले, त्यातील दोन प्रकरणात कस्टम अधीक्षक आलोक कुमार मुख्य आरोपी आहे. हा आलोक कुमार आधी दाखल असलेल्या दोन जी पे लाच प्रकरणातही आरोपी असून त्यात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. आता या नव्या प्रकरणांमुळे त्याचा जामीन रद्द होण्याची शक्यता आहे. हे रॅकेट अतिशय पद्धतशीरपणे चालवले जात होते. याचा सूत्रधार हा कस्टम विभागातीलच असण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड संहितेच्या १२० ब कलमानुसार या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले.
३० दिवसांत दाखल तक्रारींनंतर...
संबंधित तीनही प्रकरणांत ३० दिवसांत सीबीआयकडे तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतर हे तीन गुन्हे दाखल करण्यात आले. अशा प्रकरणात गेल्या काही दिवसांत ३८ कस्टम अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असल्या तरी आठवडाभरातील या तीन गुन्ह्यांनी मुंबई विमानतळ हा लाचखोर कस्टम अधिकाऱ्यांचा अड्डा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"