मुंबई : भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी म्हाडा सहा महिन्यांचा एक कालाधारित कार्यक्रम हाती घेईल. याद्वारे भेंडीबाजार प्रकल्पाच्या मागे पडलेल्या कार्याला वेग दिला जाईल. प्रलंबित कामासाठी म्हाडाकडून एक विशेष कार्यदल नेमले जाईल. महत्त्वाचे म्हणजे या भेंडीबाजार प्रकल्पादरम्यान ज्यांना पर्यायी निवासस्थाने देण्यात आली आहेत, मात्र अद्याप ज्यांनी घर रिकामे केलेले नाही अशांना पावसाळ्यापूर्वी घर रिकामे करण्यास सांगितले जाईल. शिवाय मोडकळीस आलेल्या इमारती पाडल्या जातील, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी दिल्याचे सैफी बुºहाणी अपलिफ्टमेंट प्रोजेक्टकडून (एसबीयूटी) सांगण्यात आले.भेंडीबाजार पुनर्विकास प्रकल्पाची मिलिंद म्हैसकर यांनी पाहणी केली, या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्बांधकाम मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे, निवासी कार्यकारी अभियंता अनिल अंकलगी यांच्यासह सैफी बुºहाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टचे सदस्य उपस्थित होते. म्हैसकर यांच्यासह उपस्थितांनी या वेळी मुफद्दल शॉपिंग आर्केड या वाणिज्यिक केंद्राला भेट दिली. याप्रसंगी सब क्लस्टर एक आणि तीनचे बांधकाम वेगाने सुरू असल्याची माहिती ट्रस्टकडून म्हैसकर यांना देण्यात आली. दरम्यान, पुनर्विकास प्रकल्पासाठी ट्रस्टकडून दोन हजारांहून अधिक रहिवाशांची घरे रिकामी करण्यात आली आहेत. सब एक आणि तीनचे बांधकाम वेगाने सुरू आहे. सुमारे सहाशे रहिवासी आणि २५० वाणिज्यिक संकुले या सब क्लस्टरमध्ये पुढील दोन वर्षांत पुनर्वसित करण्यात येणार असून, सर्व सब क्लस्टर्ससाठी मास्टर लेआऊटच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले.
‘त्या’ रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 2:11 AM