मुंबई - राजधानी दिल्लीत एकीकडे सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची सुनावणी सुरू असताना, दुसरीकडे शिवसेनेतील पक्षप्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका करताना आई भवानीवर विश्वास असून, विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. तर, शिंदे गटातील बंडखोर नेत्यांवर टीका करताना ते खोक्यात गेले, असे म्हटले. यावेळी, धाराशिवमधील उपस्थित शिवसैनिकांनी ५० खोक्के एकदम ओक्के अशा घोषणाही दिल्या.
आपलं कुठंही काही वाकडं झालेलं नाही. भवानीमातेची कृपाच आहे आपल्यावरती. केवळ कृपाच नाही तर तिने दाखवून दिलंय की, खरे कोण आणि खोटे कोण, असे म्हणत दसरा मेळाव्यासंदर्भात कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी मातेनं तलवार दिली होती, अशी आपली श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ही तलवार दिली आहे, तू लढ मी आहे पाठिशी. आज शिवसेना लढत असताना अनेकजण सोबत येत आहेत, त्यामुळे त्यांचं कौतुक आहेच, पुन्हा दसऱ्याला आपण भेटणार आहोतच, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी धाराशीवमधील शिवसेना कार्यकर्त्यांना विश्वास दिला.
जालन्यातील शिवसैनिक काहीवेळापूर्वी भेटून गेले. जालन्यातील परिस्थिती तुम्हाला माहितीय, असा उल्लेख करत अर्जुन खोतकर यांचं नाव न घेता टिका केली. तसेच, शिंदे गटावरही निशाणा साधला. ज्यांना तुम्ही शिवसैनिकांनी खस्ता खाऊन मोठं केलं ते खोक्यात गेले, अशी टिका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली. इतकेच काय तर ईडी कारवायांवरुनही ठाकरेंनी टोला लगावला. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते. शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधले. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी भाजप, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि शिंदे गटावर शेलक्या शब्दांत निशाणा साधला.