Join us

‘त्या’ रस्त्यांवर खड्ड्यांची परंपरा कायम

By admin | Published: August 02, 2014 1:08 AM

एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची स्थिती फारशी आलबेल नाही.

कल्याण : एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राज्य रस्ते विकास महामंडळांतर्गत येणाऱ्या रस्त्यांची स्थिती फारशी आलबेल नाही. खड्ड्यांंमुळे या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यावरील खड्ड्यांची परंपरा यंदाही कायम राहिली आहे. डोंबिवलीतील घरडा सर्कल ते टाटानाका हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. या मार्गावर मागील वर्षीही मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले होते. येथील सावली हॉटेलसमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांंची स्थिती तर गेले वर्षभर जैसे थे राहिली आहे. मागील वर्षी आॅगस्ट महिन्यात ध्रुव हर्डीकर हा १० वर्षांचा बास्केटबॉल खेळाडू या खड्ड्यामध्ये पडून जायबंदी झाल्याची घटना घडली होती. याउपरही संबंधित यंत्रणेला जाग आलेली नसून येथील खड्ड्यांंची अवस्था आजतागायत जैसे थे आहे. या मार्गावर अन्य ठिकाणीही खड्डे निर्माण झाले असून खंबाळपाडा आगारासमोरील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये खडीचा भर टाकण्यात आला आहे़ परंतु, ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे ती इतरत्र विखुरली गेल्याने खडी उडून अपघात होण्याचा संभव आहे. (प्रतिनिधी)