‘त्या’ सोसायट्यांना मालमत्ताकरात ५% सूट

By admin | Published: May 1, 2015 10:24 PM2015-05-01T22:24:32+5:302015-05-01T22:24:32+5:30

ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला-सुका कचरा वेगळा केला तरच स्वीकारण्याच्या मोहिमेत अखेर ठाण्यातील २५ सोसायट्यांनी सहभाग घेतला आहे.

'Those' societies get 5% suits in property | ‘त्या’ सोसायट्यांना मालमत्ताकरात ५% सूट

‘त्या’ सोसायट्यांना मालमत्ताकरात ५% सूट

Next

ठाणे : ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या ओला-सुका कचरा वेगळा केला तरच स्वीकारण्याच्या मोहिमेत अखेर ठाण्यातील २५ सोसायट्यांनी सहभाग घेतला आहे. त्यानुसार, आता या सोसायट्यांकडून कचऱ्याचे वर्गीकरण करूनच पालिका कचरा गोळा करीत आहे. परंतु, दुसरीकडे शहरातील सर्वच सोसायट्यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. तसेच, जे सोसायटीधारक अशा प्रकारे कचरा वेगळा करून त्याची आपल्याच सोसायटीच्या आवारात विल्हेवाट लावतील, त्यांना मालमत्ताकरात पाच टक्के सवलत दिली जाईल, असे आमिषही पालिकेने दाखविले आहे.
ठाणे महापालिका हद्दीत आजघडीला रोज ६५० मेट्रीक टन कचऱ्याची निर्मिती होत आहे. सध्या हा कचरा दिव्यातील एका खाजगी जागेवर टाकला जात आहे. तसेच आता पालिकेने तळोजा येथील सामायिक भरावभूमीत सहभागी होण्यासाठी पावले उचलली आहेत. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार घनकचरा व्यवस्थापन नियम हाताळणी व व्यवस्थापन २००० नुसार घनकचरा निर्माण करणाऱ्या प्रत्येक घटकांनी ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार, एप्रिल महिन्यात पालिकेने सोसायट्यांपर्यंत जाऊन जनजागृती सुरू केली होती. तसेच प्रत्येक सोसायटीला नोटीस बजावली होती. या नोटिसीद्वारे जे ओला-सुका कचरा वेगळा करणार नाहीत, त्यांचा कचराच उचलला जाणार नसल्याचा इशारा पालिकेच्या घनकचरा विभागाने दिला होता. परंतु, काही सोसायट्यांनी यासाठी मुदतवाढ मागितल्याने त्यांना ती देण्यात आली होती. परंतु, तरीदेखील काहींनी या मोहिमेत सहभाग न घेतल्याने पाच सोसायट्यांंचा कचरा तब्बल तीन दिवस उचललाच गेला नव्हता. अखेर, या सोसायट्यांंनीदेखील यात सहभाग घेऊन आता ही मोहीम यशस्वी करण्यात साथ दिली आहे. आता टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच सोसायट्यांचा कचरा अशा पद्धतीनेच गोळा केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. परंतु, ज्या सोसायट्या अशा प्रकारे कचरा वेगळा करून देणार नाहीत, त्यांना काही दिवसांची मुदतवाढ देऊ. परंतु, तरीही त्यांनी असहकार पुकारला तर त्यांचा कचरा उचलला जाणार नसल्याचे पालिकेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

Web Title: 'Those' societies get 5% suits in property

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.