एमबीएसाठी ‘त्या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:24 AM2020-12-15T04:24:19+5:302020-12-15T04:24:19+5:30
कॅट, सीमॅट, अॅटमा परीक्षा दिलेल्यांसाठी पुन्हा नोंदणी हाेणार सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक ...
कॅट, सीमॅट, अॅटमा परीक्षा दिलेल्यांसाठी पुन्हा नोंदणी हाेणार सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी) किंवा केंद्रीय प्रवेश परीक्षाच (कॅट, सीमॅट, अॅटमा) प्रवेशासाठी ग्राह्य धरण्याचा सरकारचा निर्णय लागू करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यानुसार सीईटी सेलने एमबीए प्रवेश प्रक्रियेची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर याबाबत राज्य सरकारच्या सूचनांनंतर पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येतील, असे स्पष्ट केले आहे.
गतवर्षीपर्यंत खासगी संस्था, संस्थांच्या संघटना यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या अॅटमा, सॅट, मॅट यांसारख्या अनेक परीक्षांचे गुण प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येत होते. परंतु गतवर्षी सुमारे ४० विद्यार्थ्यांनी खासगी संस्थांच्या परीक्षांची खोटी गुणपत्रके जोडून नामवंत संस्थांमध्ये प्रवेश घेतल्याचे उघड झाले. त्यामुळे व्यवस्थापन पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी, कॅट, सीमॅट या परीक्षांचेच गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, हा निर्णय सीईटी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात आला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची संधी गेली.
सरकारच्या या निर्णयाला अॅटमा ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्याने न्यायालयात आव्हान दिले हाेते. या प्रकरणी तीनच प्रवेश परीक्षा ग्राह्य धरण्याच्या आदेशाची पुढील वर्षीपासून अंमलबजावणी करावी, असा निर्णय देण्यात आला.
न्यायालयाच्या या निर्णयानुसार सीईटी सेलने एमबीएची प्रवेश प्रक्रिया तात्पुरती थांबविली आहे. तर, राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा प्रवेश सुरू करण्यात येणार आहेत.
* अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रिया सुरू
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश परीक्षेच्या सीईटी निकालानंतर सीईटी सेलने अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र प्रवेश प्रक्रिया सुरू केल्या आहेत. येत्या शुक्रवारपर्यंत या प्रवेश प्रक्रियांचे सीट मॅट्रिक्स जाहीर करण्यात येईल, अशी माहिती सीईटी सेलने दिली.
--------------------