Join us

दोन्ही डोस घेतलेल्यांना देशांतर्गत प्रवासासाठी नियम शिथिल करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:09 AM

पालिका आयुक्तांचे मुख्य सचिवांना पत्रलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ...

पालिका आयुक्तांचे मुख्य सचिवांना पत्र

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल देणे बंधनकारक करण्यात आले. मात्र, आता कोरोनाचा प्रसार नियंत्रणात येत असून, बहुतांशी नागरिकांनी लस घेतली आहे. त्यामुळे कोविड प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशाला मुंबईत येताना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सादर करण्याच्या अटीतून वगळण्यात यावे, अशी विनंती मुंबई पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी राज्याचे मुख्य सचिवांना केली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने देशांतर्गत प्रवासावरही काही कडक निर्बंध आणले होते. त्यानुसार मुंबई विमानतळावर येण्यापूर्वी ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल संबंधित प्रवाशांनी सादर करणे बंधनकारक केले होते. प्रामुख्याने गुजरात, गोवा, दिल्ली, राजस्थान आणि केरळ या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू करण्यात आला होता.

बहुतेक प्रवासी व्यावसायिक कामानिमित्त २४ तासांत देशांतर्गत प्रवास करून मुंबईत परतात. अशावेळी ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह अहवाल आणणे शक्य होत नाही. त्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांना या नियमातून वगळण्यात यावे, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.