दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी; प्रवाशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 06:13 AM2021-06-08T06:13:09+5:302021-06-08T06:13:31+5:30

Mumbai Local : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे आता राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही; परंतु आता लसीचे दोन डोस पूर्ण केल्याने कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे.

Those taking two doses should be allowed to travel locally; Passenger demand | दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी; प्रवाशांची मागणी

दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्याची मुभा द्यावी; प्रवाशांची मागणी

Next

मुंबई : राज्यात अनलॉकची प्रक्रिया आता सुरू झाली असली तरीही लोकल प्रवासावरील निर्बंध अद्यापही कायम आहेत. यामुळे नोकरदारांना तसेच व्यापाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यास अडचणी निर्माण होत आहेत. हे लक्षात घेता ज्या नागरिकांनी लसीचे दोन डोस पूर्ण केले आहेत, अशांना रेल्वेने प्रवासाची परवानगी द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यामुळे आता राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये विभागणी करून अनलॉकला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही; परंतु आता लसीचे दोन डोस पूर्ण केल्याने कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे. यामुळे हळूहळू सर्व उद्योगधंदे व व्यापार पूर्वपदावर येण्यास सुरुवात होईल, असे असले तरी मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या रेल्वेमध्ये प्रवासाचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

केवळ अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनाच रेल्वेने प्रवासाची मुभा आहे. यामुळे रेल्वे प्रवासावर अवलंबून असणाऱ्या नागरिकांचे हाल अद्यापही कायम आहेत; परंतु लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय?
शासनाच्या विनंतीनुसारच रेल्वे सुरू करण्यात आली आहे. शासनाने अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासाची परवानगी दिली आहे. अशा प्रवाशांना रेल्वे प्रवास करून दिला जात आहे. 
दोन डोस पूर्ण केलेल्या प्रवाशांना शासनाने प्रवासाची परवानगी दिल्यास रेल्वे प्रवाशांना प्रवास करू दिला जाईल, असे रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे


ज्या नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस पूर्ण केले आहेत, त्यांना प्रवासाची परवानगी द्यायलाच हवी. डब्ल्यूएचओनेही सांगितले आहे की, लसीचे दोन डोस पूर्ण केल्यानंतर ९९ टक्के कोरोनाची बाधा होत नाही. आज अनेक लोकल रिकाम्या जात आहेत. दोन डोस घेतलेले नागरिक कोरोनापासून सुरक्षित असतील तर त्यांना प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही. आज नोकरी, व्यवसायावर परिणाम झाल्यामुळे तसेच आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण तणावाखाली आहेत. सर्व काही अनलॉक करून जर का लोकल बंद राहणार असेल तर अशा अनलॉकचा काहीही फायदा होणार नाही.
- नंदकुमार देशमुख (अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ)

मुंबईत केवळ बसने प्रवास करणे अशक्य आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग राखले जात नाही. यासाठी निदान दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तरी लोकलने प्रवासाची परवानगी द्यायला हवी, अन्यथा बसस्थानकांवर रोज नोकरदारांच्या रांगा वाढताना दिसतील.
- समीर घोडके (मानखुर्द)

लसीचे २ डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका कमी आहे. तसेच लसीकरणाने शहरात बऱ्यापैकी वेग पकडला आहे. त्यामुळे आता २ डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवासासाठी परवानगी द्यायला हवी.
             - प्रतीक्षा साळुंखे (दादर)

कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही; परंतु आता लसीचे दोन डोस पूर्ण केल्याने कोरोनाबद्दलची भीती कमी झाली आहे. आता पुन्हा एकदा नोकरी-व्यवसायावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. यासाठी २ डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्यायलाच हवी.
- दिनकर वायदंडे (मुलुंड)

सर्व काही सुरू करून जर नागरिकांना मुंबईच्या लाइफलाइन म्हणजेच लोकलने प्रवास करून दिला नाही तर काहीच साध्य होणार नाही. त्यामुळे निदान दोन डोस घेतलेल्या नागरिकांना तरी रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी.
- कैलास खरात (चेंबूर)

Web Title: Those taking two doses should be allowed to travel locally; Passenger demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.