‘त्या’ तिघा पोलिसांना जामीन, सात वर्षे कारागृहाची सुनावली होती शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 02:34 AM2018-06-26T02:34:47+5:302018-06-26T02:34:50+5:30
चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या २० वर्षीय मुलाच्या कोठडी मृत्यूप्रकरणी सात वर्ष कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तीन पोलिसांचा जामीन उच्च न्यायालयाने सोमवारी मंजूर केला.
मुंबई : चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या २० वर्षीय मुलाच्या कोठडी मृत्यूप्रकरणी सात वर्ष कारागृहाची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या तीन पोलिसांचा जामीन उच्च न्यायालयाने सोमवारी मंजूर केला.
उमेश गोसावी, संदीप साळुंके आणि किरण पिंगळे या तीन पोलिसांची न्या. भूषण गवई आणि सारंग कोतवाल यांच्या खंडपीठाने जामिनावर सुटका केली. अनिकेत खिच्ची याच्या कोठडी मृत्यूप्रकरणी जानेवारी २०१६ मध्ये सत्र न्यायालयाने मुख्य हवालदार चंद्रकांत कांबळे याच्यासह या तिघांना दोषी ठरवत सात वर्षाची कारावासाची शिक्षा ठोठावली.
लॅपटॉप चोरल्याप्रकरणी गोरेगावच्या वनराई पोलीस ठाण्याने आॅक्टोबर २०१३ मध्ये खिच्ची व रतन वाणी यांना अटक केली. न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, चार पोलिसांनी खिच्ची याला मारहाण केली. दुसऱ्या दिवशी खिच्ची याला जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
सत्र न्यायालयाने या तिघांनाही सदोष मनुष्यवध, खिच्ची याचा कबुलीजबाब घेण्यासाठी त्याला मारहाण करणे या आरोपांअंतर्गत दोषी ठरवले. सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला कांबळेव्यतिरिक्त उमेश गोसावी, संदीप साळुंखे आणि किरण पिंगळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
चोराला ताब्यात घेण्यापूर्वीच लोकांनी त्यांना खूप मारहाण केली होती, असा युक्तिवाद आरोपींतर्फे ज्येष्ठ वकील राजीव चव्हाण व विनय भानुशाली यांनी न्यायालयात केला.
अपिलानुसार, तिघांवर कारवाई करण्यापूर्वी सरकारकडून मंजुरी घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना बेकायदेशीररीत्या अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ते केवळ त्यांचे कर्तव्य बजावत होते. या तिघांच्याही अपिलावरील सुनावणी उच्च न्यायालात प्रलंबित आहे.