"ती वाघनखंही महाराष्ट्रात येणार, ज्याने अफझलनाखानाचा कोथळा बाहेर काढला"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 09:54 AM2022-12-06T09:54:28+5:302022-12-06T11:03:27+5:30
जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली जगदंबा ही तलवार इंग्लंड येथील राणीच्या वैयक्तिक संग्रहालयात रॉयल कलेक्शन ट्रस्ट येथे ठेवण्यात आली आहे. याचे ठोस पुरावे तेथील सी. प्युरडॉन क्लार्क यांनी तयार केलेल्या कॅटलॉगमुळे मिळाल्याची माहिती सह्याद्री इतिहास संशोधन केंद्राचे सचिव अमित आडसुळे आणि शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे अध्यक्ष हर्षल सुर्वे यांनी यापूर्वीच दिली होती. आता, हीच जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासोबतच आता शिवरायांनी अफजलखानाला ठार करतेवेळी वापरलेल्या वाघनख्याही आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वने व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
जगदंबा तलवार पाठोपाठ आता छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे राज्यात परत आणणार असल्याची घोषणाच सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, शिवरायांनी वापरलेले वाघ नखं पुन्हा मिळावेत यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा सुरू असून शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच शिवरायांनी वापरलेली ही वाघनखं सध्या ब्रिटनमध्ये असून याआधी शिवरायांची जगदंबा तलवार परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, शिवराज्याभिषेक दिनाला २०२४ साली ३५० वर्षे पूर्ण होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ६ जून २०२४ हा संकल्प आणि शपथ दिवस असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
कॅटलॉगमधील जगदंब तलवारीचे वर्णन
जुनी युरोपिअन एकपाती, सरळ तलवार, ज्याच्या दोन्ही बाजूला दोन खोबणी असून, एकामध्ये आयएचएस असे तीन वेळा कोरले आहे. तलवारीच्या मुठीजवळील गजावरती सोन्यामध्ये फुलांची नक्षी कोरली आहे. तलवारीची मूठ लोखंडी असून, त्याला गोलाकार परज असून, शेवटचे टोक अणकुचीदार आहे आणि त्यावर भरीव सोन्याने कोरलेली फुलांची नक्षी असून, त्यामध्ये मोठे हिरे व माणिक जडवलेले आहेत. ही तलवार कोल्हापूरच्या मा. छत्रपतींच्याकडून दिली गेली असून, ती मराठ्यांचे प्रमुख शिवाजी यांची निशाणी आहे. सदर तलवार ही त्यांच्या वापरातील होती.