Join us

टपाल तिकिटावरील ती दोन छोटी मुलं मुंबईत आहेत प्रख्यात डॉक्टर

By संतोष आंधळे | Published: November 30, 2023 7:54 AM

Postage Stamp: त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे...

- संतोष आंधळे मुंबई - त्यावेळी ते दोघे अवघ्या चार वर्षांचे होते. त्यांचे सहज काढलेले फोटो बालदिनी टपाल तिकिटावर प्रसिद्ध झाले. त्या गोष्टीला आता सहा दशकं उलटली. मात्र, तो क्षण आजही आम्ही जगत आहोत. तो बालदिन आमच्यासाठी आजही खास आहे... या भावना आहेत डॉ. प्रशांत मंगेशीकर आणि डॉ. अनिल भिडे यांच्या. 

स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. मंगेशीकर सैफी रुग्णालयात लॅप्रोस्कोपिक सर्जन आहेत. तर डॉ. भिडे यांचे नवी मुंबई येथे क्लिनिक असून ते मॅक्सिफेशिअल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. १४ नोव्हेंबर १९६० रोजी बालदिनानिमित्त टपाल खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या तिकिटावर डॉ. मंगेशीकर आणि डॉ. भिडे यांची छायाचित्रे झळकली होती. 

असे टिपले होते छायाचित्र... - गिरगावातील साहित्य संघ मंदिराजवळ डॉ. मंगेशीकर आणि डॉ. भिडे यांचे वास्तव्य होते. दोघांचे वडील अनुक्रमे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि भूलतज्ज्ञ. लहान वयात प्रशांत आणि अनिल दोघांचीही मैत्री जुळली. बालपणीचे दोन्ही मित्र एका सायंकाळी चर्नी रोड स्थानकाबाहेरील बाल भवन जवळ खेळण्यासाठी गेले होते. योगायोगाने सुप्रसिद्ध छायाचित्रकार आर. आर. प्रभू तिथेच होते. त्यांनी या दोन्ही मुलांना एकत्र खेळताना पाहून जवळ बोलावले. - चौकशीनंतर दोघांच्या हाती त्यांनी पृथ्वीचा गोल देत तुम्ही कुठे राहता, हे शोधायला सांगितले. औत्सुक्याने प्रशांत आणि अनिल यांनी तो पृथ्वीचा गोल न्याहाळत आपले ठिकाण शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. तो क्षण प्रभू यांनी कॅमेऱ्यामध्ये अचूक टिपला. त्यानंतर प्रभू यांनी उभयतांच्या घरी दूरध्वनी करून दोघांचे छायाचित्र काढल्याची माहिती दिली. तसेच राजधानी नवी दिल्लीत एका स्पर्धेसाठी मुलांची छायाचित्रे पाठवल्याचेही सांगितले.

थेट नेहरूंच्या हस्ते तिकीट अनावरण - दिल्लीतील छायाचित्र स्पर्धेत प्रशांत आणि अनिल यांच्या त्या छायाचित्राची केवळ निवडच नव्हे तर १४ नोव्हेंबर १९६० रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या टपाल तिकिटावर हे छायाचित्र झळकणार असल्याची माहिती प्रभू यांनी कुटुंबीयांना दिली. - दोघांच्याही कुटुंबात आनंदाची लहर उमटली. डॉ. प्रशांत मंगेशीकर यांच्या वडिलांनी तर १५ पैसे मूल्याची ती तिकिटे विकत घेऊन नातेवाइकांमध्ये वाटली. - दोघांचेही कोडकौतुक झाले. आज ६३ वर्षांनंतरही दोन्ही डॉक्टरांचे मैत्र तसेच टिकून असून ते आजही या क्षणाची आठवण काढतात. - एका मोठ्या औषधनिर्मात्या कंपनीच्या औषधखोक्यावरही दोघांचा फोटो झळकला होता. त्यावेळी दोघांनाही प्रत्येकी ५० रुपयांचे मानधन मिळाल्याची आठवण डॉ. प्रशांत मंगेशीकर आणि डॉ. अनिल भिडे सांगतात.

टॅग्स :पोस्ट ऑफिसमुंबईडॉक्टरबालदिन