Join us

ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:31 PM

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत.

औरंगाबाद - एमआयएमचे नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही. मात्र, एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीकाही केली. तत्पूर्वी बोलताना खासदार इम्तियाज जलिल यांनीही राज ठाकरेंवर उपरोधात्मक टिका केली. 

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. राज्याला आणि समाजाला शिक्षणाची खूप गरज आहे. त्यामुळेच, अकबरुद्दीन औवेसींनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. गरिब मुलांसाठी मोफत शिक्षण मिळावे, यासाठी ते शाळा बांधत आहेत. त्याच्या पायाभरणीसाठीच ते आले होते. ज्याप्रमाणे आज अकबरुद्दीन औवेसींनी औरंगाबादेत मोफतची शाळा बांधण्याची घोषणा केली, तशीच घोषणा इतर राजकीय पक्षांनीही करायला हरकत नाही, असे खासदार इम्तियाज जलिल यांनी म्हटले.

राज ठाकरेंना लगावला टोला

या चांगल्या कामांची स्पर्धा असायला हवी. औवेसींनी एक शाळा बांधली, शिवसेनेनं दोन शाळा बांधाव्यात, भाजपने सांगावे आम्ही 4 शाळा अशा बांधू. विशेष म्हणजे ज्यांना फक्त अजान ऐकू येतं, त्यांनी कमीत कमी एक शाळा उघडण्याच्या बाबतीत बोलावं, असे म्हणत जलील यांनी नाव न घेता राज ठाकरेंना उपरोधात्मक टोला लगावला. खुलताबाद येथे अनेक दर्गे आहेत. सर्वांचे दर्शन घेत आम्ही तिथे गेलो. यावेळी आम्ही कोणा एकाच्या कबरीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत, असे म्हणत औरंगजेबच्या समाधीचं दर्शन घेतल्याचं समर्थन केलं. 

औवेसींनी औरंगजेबच्या समाधीवर फुले वाहिली

एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी खुलताबाद येथे येणार असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आ. औवेसी यांना बघण्यासाठी व भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. खुलताबाद येथील बावीस खाजा दर्गा परिसरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास आ. अकबरुद्दीन औवेसी यांचे आगमन झाले या ठिकाणी हजरत खाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जावून दर्शन घेतले. त्यानंतर औरंगजेब याच्या कबरीवर जावून त्यांनी फुले वाहिली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दर्गा परिसरातील मशीदमध्ये जावून सर्वसामान्यपणे नमाज अदा केली. त्याचबरोबर बाबा बु-हानोद्दीन दर्गेत  तसेच उरूस मैदान परिसरातील जर जरी जर बक्ष दर्गेत दर्शन घेतले. आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी कुठलाही चर्चा केली नाही

टॅग्स :राज ठाकरेशाळाऔरंगाबादइम्तियाज जलीलमनसे