"जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्रात गेले", कमलनाथांची उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 08:56 AM2022-06-23T08:56:22+5:302022-06-23T08:59:09+5:30
कलमनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना चिमटा काढला आहे
मुंबई - राज्यातील राजकीय भूकंपाने देशातील काँग्रेस पक्षालाही हादरा बसला आहे. एकीकडे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा झालेला पराभव आणि दुसरीकडे शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी बंड केल्यामुळे अल्पमतात आलेलं महाविकास आघाडी सरकार सर्वांचीच धाकधूक वाढवत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी महाराष्ट्र दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर उद्धव ठाकरेंसोबत फोनवरुन चर्चा केली. आता, या भेटीवरुन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कमलनाथ यांना टोला लगावला आहे.
कलमनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी त्यांना चिमटा काढला आहे. महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर आलेल्या संकटावर मार्ग काढण्यासाठी गेलेल्या कमलनाथ यांना उद्देशून चौहान यांनी खिल्ली उडवली. जे स्वत:चं सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्राचं सरकारा काय वाचवणार, असा टोला मुख्यमंत्री चौहान यांनी लगावला आहे. ''काँग्रेस झाली अनाथ आणि महाराष्ट्रात गेले कमलनाथ'', मध्य प्रदेशात जे स्वत:चे सरकार वाचवू शकले नाहीत, ते महाराष्ट्रातील सरकार काय वाचवणार, अशी टिका चौहान यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मातोश्रीवर, आणखी ६ आमदार गुवाहटीकडे
'ज्यांना जायचं आहे त्यांनी जा...'असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बुधवारी रात्री 'वर्षा'वरून 'मातोश्री'कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. त्यानंतर, ६ आमदारांनी शिंदेंची वाट धरली आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार दीपक केसरकर, मंत्री दादा भुसे, आमदार संजय राठोड, दादरमधील आमदार सदा सरवणकर, कुर्ला विभागातील आमदार मंगेश कुडाळकर आणि चांदिवली विभागाचे आमदार दिलीप लांडे हे नॉट रिचेबल असून सूरतमार्गे गुवाहटीला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर शिंदेंचं ट्विट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधावारी नागरिकांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात बंडखोर आमदार आणि त्यांच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. शिवाय, एकनाथ शिंदे यांना समोरासमोर चर्चेला येण्याचे आवाहनही केले. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर लागोपाठ दोन ट्विट करत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सुनावले आहे.