ज्यांना नाही वाली अशा निराधारांना ‘ते’ देतात मुखाग्नी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 07:01 AM2021-03-04T07:01:43+5:302021-03-04T07:01:50+5:30
ताडदेव पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले ज्ञानदेव वारे हे १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रूजू झाले. चेंबूरमध्ये पत्नी, मुलगी, मुलासोबत ते राहतात. सुरुवातीची ६ वर्षे त्यांनी पोलीस ठाण्यात सेवा बजावली. २००० मध्ये रजेवरून कर्तव्यावर रूजू होताच त्यांना शववाहिनीवर चालक म्हणून जबाबदारी दिली.
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शवागृहातून बेवारस मृतदेह ताब्यात घ्यायचा. कुजलेला, छिन्नविछिन्न झालेल्या शरीराचे भाग शववाहिनीत ठेवून स्मशानाची वाट धरायची. कधी मुलगा, कधी बाप तर, कधी भाऊ बनून अग्नी द्यायचा, हा जणू त्यांचा दिनक्रम. मुंबई पोलीस दलातील अंमलदार ज्ञानदेव वारे (५२) यांच्या या अविरत सेवेला २० वर्षे पूर्ण झाली. या सेवेत त्यांनी १ लाखांहून अधिक बेवारस मृतदेहांंना अग्नी दिला. कोरोना काळातही अविरत सेवा करून ५०० काेराेनाबाधितांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.
ताडदेव पोलीस ठाण्याशी संलग्न असलेले ज्ञानदेव वारे हे १९९५ मध्ये मुंबई पोलीस दलात रूजू झाले. चेंबूरमध्ये पत्नी, मुलगी, मुलासोबत ते राहतात. सुरुवातीची ६ वर्षे त्यांनी पोलीस ठाण्यात सेवा बजावली. २००० मध्ये रजेवरून कर्तव्यावर रूजू होताच त्यांना शववाहिनीवर चालक म्हणून जबाबदारी दिली. वारे सांगतात, सुरुवातीला हात थरथरले. भीती वाटली. नकळ रडलो. ताप आला. झोप उडाली. भूकही लागेना. रात्री - अपरात्री स्वप्नात फक्त मृतदेहच दिसत होते. त्यावेळी थांबू की पुढे जाऊ, असा प्रश्न स्वतःलाच केला. हीदेखील एक सेवाच असल्याचे मनाला समजावून काम सुरूच ठेवले. कुठल्या अनोळखी व्यक्तिला आपण त्याचा जवळचा नातेवाईक म्हणून अग्नी देतो, याचे माेल केलेच जाऊ शकत नाही. यातून खूप माेठे समाधान मिळते, असे ते म्हणाले.
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिथे रक्ताचे नातेवाईकही दुरावले, अशावेळी केवळ तोंडाला मास्क आणि हातात ग्लोज घालून ५०० कोरोनाबाधित मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. हिंदूचे हिंदू धर्मानुसार, तर मुस्लिम बांधवांचे बडा कब्रस्तान येथे दफनविधी केले. बुधवाऱीही ८ बेवारस मृतदेहाना त्यांनी अग्नी दिल्याचे वारे म्हणाले.
nसुरुवातीला रात्री स्वप्नात फक्त मृतदेहच दिसायचे. त्यावेळी ही एक सेवाच असल्याचे मनाला समजावले.
nअनोळखी व्यक्तिला नातेवाईक म्हणून अग्नी देतो, याचे खूप माेठे समाधान मिळते, असे वारे यांनी सांगितले.
अजूनही शेकडो बेवारस मृतदेह प्रतीक्षेत
nवारे यांच्यावर दक्षिण आणि मध्य मुंबईची जबाबदारी आहे. याअंतर्गत जे. जे., नायर, केईएम, सायन, कामा, शिवडी, जीटीबीसारखी महत्त्वाची रुग्णालये आहेत.
nदिवसाआड ५ ते ६ बेवारस मृतदेहांवर ते अंत्यसंस्कार करतात. जे. जे. रुग्णालयात १००, सायनमध्ये ६५, नायर ३० ते ३५, केईएम ४० बेवारस मृतदेह अजूनही
अंत्यसंस्कारांच्या प्रतीक्षेत आहेत.