- आ. आशिष शेलार(अध्यक्ष, भाजप, मुंबई)
महायुतीच्या सरकारने महामुंबईतील सर्व पुलांच्या खाली, रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबावर सुशोभीकरण केले, मात्र त्यात उधळपट्टी नाही. मुंबईच्या सुशाेभीकरणाचे काम अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र ज्यांना स्वत: काही करायचे नाही, तेच केवळ टीका करीत आहेत, असा टोला भाजपने लगावला आहे. माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात फक्त एकाच भागापुरते सुशोभीकरण मर्यादित होते. मुंबईकरांना सुविधा तर मिळत आहेतच; शिवाय येथे येणाऱ्या देशातील आणि परदेशातील पर्यटकांनाही मुंबईचे हे सौंदर्यीकरण भावते आहे, असा दावा भाजपने केला आहे.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या सुशोभीकरणावर टीका केली जात आहे. मात्र टीका करणाऱ्यांनी त्यांच्या काळात काय केले, याचा पुरावा द्यावा. महाविकास आघाडीने मुंबईशी दगाबाजी केली. मुंबईच्या सुशोभीकरणासाठी पैशांची उधळपट्टी केल्याचे म्हटले जाते. महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते. त्यावेळी महापालिकेच्या पैशांतून परळ, प्रभादेवी स्टेशनजवळ सुशोभीकरण होत होते. त्यानंतर थेट वरळी येथून कलानगरच्या सिग्नलला पाणी तुंबू नये म्हणून नऊ-नऊ पंप लावून तिथे सुशोभीकरण होत होते. ठाकरेंच्या दृष्टीने मुंबई म्हणजे वरळी आणि कलानगर. कारण युवराजांचा मतदारसंघ आणि दुसरे निवासस्थान. दोन ठिकाणी काम केले म्हणजे मुंबईला खूप काही दिले, असा यांचा आविर्भाव होता. मात्र पाहायला गेले तर त्यांच्या काळात त्यांनी एकही गोष्ट केलेली नाही.
महायुतीच्या सरकारने सर्व पुलांच्या खाली, रस्त्यांवरील दिव्यांच्या खांबावर सुशोभीकरण केले, मात्र त्यात उधळपट्टी नाही. मुंबईच्या सुशाेभीकरणाचे काम अत्यंत योग्य पद्धतीने सुरू आहे. मात्र ज्यांना स्वत: काही करायचे नाही, तेच केवळ टीका करीत आहेत. माजी मुख्यमंत्र्यांच्या काळात फक्त एकाच भागापुरते सुशोभीकरण मर्यादित होते. त्यांना फक्त स्वत:चे घर दिसत होते. मात्र आता संपूर्ण मुंबईला समान निधी मिळत असून त्या माध्यमातून हे सुशोभीकरण होत आहे. गेट वे ऑफ इंडियापासून ते थेट मुलुंड आणि दहीसरपर्यंत सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. यामुळे मुंबईकरांना सुविधा तर मिळत आहेतच शिवाय येथे येणाऱ्या देशातील आणि परदेशातील पर्यटकांनाही मुंबईचे हे सौंदर्यीकरण भावते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या पद्धतीने मुंबईतील रस्ते, चौक असोत की पदपथ यांचे योग्य पद्धतीने सुशोभीकरण सुरू असून येत्या काळात मुंबईचा कायापालट झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय शहरांच्या यादीत सुंदर शहर म्हणून मुंबईचेही नाव नोंदवले जाईल.