लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ऑनलाईन रेटींग टास्क फ्रॉड प्रकरणात गुन्हे शाखेने अहमदनगरच्या त्रिकुटासह हरियाणाच्या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हरियाणातील कुलदीप सज्जन कुमार (३१), नगरचे विशाल लक्ष्मण मोहिते (३४), शुभम भाऊसाहेब लोखंडे (२२), आकाश विठोबा मुजमुले (२२) अशी अटक आरोपींची नावे आहे.
तक्रारदार यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉटसअपवर संपर्क साधला. ते एका टेक्नो इंडस्ट्रीजमध्ये काम करत असून, गुगल मॅपवर हॉटेलला रेटींग देण्याच्या पार्ट टाईम जॉब बाबत सांगीतले. तक्रारदार यांनी होकार देताच त्यांना रेटींगचे टास्क देत, त्याबदल्यात बँक खात्यात पैसे जमा करून त्यांचा विश्वास संपादन केला. काही दिवसाने त्यांना गुंतवणूक करण्यात सांगून बदल्यात २६ लाखापर्यंत तात्काळ परतावा मिळण्याचे आमीष दाखविले. आरोपींनी
टेलीग्राम ग्रुपवर दिलेल्या बँक अकाउंटमध्ये ९ लाख ६८ हजार गुंतवले. त्यांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावताच, त्यांना टेलीग्राम ग्रुपमधुन हटवले. अखेर, यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. कक्ष ५ चे प्रभारी पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, पोलीस निरीक्षक अजित गोंधळी, सपोनि अमोल माळी, अंमलदार अविनाश चिलप, प्रमोद पाटील, भाऊसो पवार व हरेश कांबळे यांनी तपास सुरू केला.
असा घेतला शोध
तांत्रिक तपासात, आरोपी लोणावळा येथील एका हॉटलेमध्ये थांबून फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानुसार, पथकाने पुणे येथून आरोपींना अटक केली. त्यापाठोपाठ कमिशनवर काम करणाऱ्या नगरच्या आरोपींना अटक केली. अटक आरोपीकडुन ८ मोबाईल फोन व साडे तीन लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. त्यांच्या बँक खात्यात ०९,२७,००० रुपयांची रक्कम फ्रिज करण्यात पथकाला यश आले. या टोळीने अश्या प्रकारे अनेक जणांची टेलीग्राम अॅप ग्रुपद्वारे फसवणुक केली असून त्यानुसार, तपास सुरू आहे.
...
वेळीच सावध व्हा...
अश्या प्रकारे टेलीग्राम, फेसबुक किंवा व्हॉटसअप ग्रुपवर पैश्यांचे बदल्यात ऑनलाईन टास्क देणारे किंवा गुंतवणुकीवर तात्काळ जास्तीचा परतावा देणा-या आमीषांना नागरीकांनी बळी न पडता तात्काळ अश्या
प्रकारच्या टेलीग्राम ग्रुप / मोबाईल क्रमांक / बँक खात्यांची माहीती पोलीसांना दयावी असे आवाहन गुन्हे शाखेने केले आहे.