मुंबईत रविवारी घराबाहेर पडणाऱ्यांनी इकडे लक्ष द्या!, मध्य आणि हार्बर रेल्वे असा असेल ब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 12:51 PM2023-09-02T12:51:33+5:302023-09-02T12:51:47+5:30
पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार, २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मुंबई : रविवार हा सुटीचा वार असल्याने अनेक जण मुंबईत फिरण्याचा बेत आखत असतात. मात्र, तुम्ही कोणत्या मार्गावर कुठे मेगा ब्लॉक आहे, ते जाणून घेतले नाही तर मध्येच अडकून पडाल. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरिता उपनगरीय विभागांत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर रविवारी, ३ सप्टेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवार, २ सप्टेंबर रोजी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई ते वैतरणा स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री १:३० ते ४:३० पर्यंत ब्लॉक असेल. त्यामुळे रविवारी दिवसकालीन ब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वे
कुठे : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:२५ ते दुपारी ३:३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील.
ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी १०:५० ते दुपारी ३:४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
हार्बर रेल्वे
कुठे : मानखुर्द-नेरूळ अप आणि
डाउन हार्बर मार्गावर
कधी : सकाळी ११:१५ ते सायं. ४:१५ वाजेपर्यंत
परिणाम : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०:१८ ते दुपारी ३:२८ पर्यंत पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सकाळी १०:३७ ते दुपारी ३:४५ पर्यंत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-मानखुर्द या भागावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांवरील ट्रान्सहार्बर लाइन सेवा आणि मेन लाइन सेवा सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत उपलब्ध असतील.
नाइट ट्रॅफिक ब्लॉक
कसारा येथे पॉइंट क्रॉसिंगच्या कामासाठी शनिवारी-रविवारी नाइट ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक रात्री ११:०५ वाजल्यापासून ते मध्यरात्री १:०५ वाजेपर्यंत असणार आहे. ब्लॉक कालावधीत उपनगरीय गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/ओरिजिनेशन करण्यात येणार आहे. कसारा लोकल सीएसएमटी येथून रात्री ९:३२ वाजता सुटेल आणि टिटवाळा येथे शॉर्टटर्मिनेट करण्यात येणार आहे. कसारा येथून मध्यरात्री ३:५१ वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल टिटवाळा येथून सुटणार आहे.