Join us

ज्यांना शक्य सेल त्यांनी शुल्क भरावे अन्यथा शिक्षकांचे पगार अडकण्याची भीती 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 5:43 PM

खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन 

 

मुंबई : लॉकडाऊन दरम्यान पालकांकडून शुल्क आकारण्यात येऊन नये या शिक्षण विभागाच्या सूचनांमुळे एकीकडे पालकांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र खासगी शाळांमध्ये नाराजी पसरली आहे.  व्हीजनरी इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (वेस्टा) या इंग्रजी खासगी माध्यमाच्या शाळांनी शुल्क परिपत्रकात बदल करून पालकांप्रमाणे शैक्षणिक संस्थांना ही दिलासा देण्याची मागणी केली आहे. खासगी विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना कोणतेही अनुदान मिळत नसते, त्या पूर्णपणे ट्रस्ट आणि बऱ्याच प्रमाणात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कावर अवलंबून असतात. शाळांना पुढील महिन्यात शुल्क न मिळाल्यास तेथील शिक्षकांवर उपासमारीची वेळ येईल अशी प्रतिक्रिया देत परिपत्रकात बदल करत शिथिलता आणण्याची मागणी करण्यात आली आहे.ज्या पालकांची आर्थिक स्थिती उत्तम आहे अशा पालकांनी शुल्क भरावे असे आवाहन संघटनेकडून करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारने नवे परिपत्रक काढून पालकांना शुल्क भरण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार शाळांनी शुल्काचे हप्ते पाडून द्यावेत, जेणेकरून पालकांना शुल्क भरणे सोयीचे ठरेल. मात्र शुल्क भरण्यासाठी कोणतीही सक्ती असणार नाही असे एक वाक्य त्यात जोडल्यास शाळा आणि पालक या दोघांसाठी हे सोयीचे ठरेल, असे वेस्टाने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पालकांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर त्यांना शुल्क भरण्यास हरकत नसावी. परंतु शुल्क भरण्यासाठी सक्षम असलेल्या पालकांनीही त्यासाठी दिरंगाई केल्यास खाजगी शाळा प्रशासनास आपल्या कर्मचारी आणि शिक्षकांना पगार देण्यात अडचणीचे ठरू शकते. खासगी शाळांमधील कर्मचारी वर्गाचे पगार हे केवळ विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावरच अवलंबून असतात. परंतु ग्रामीण भागातील पालकांकडून वेळेत शुल्क भरण्यात येत नसल्याने अनेकदा शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वेळेत पगार देण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर हे निवेदन देण्यात आले आहे. 

सध्याच्या परिपत्रकाचा गैरअर्थ काढत पगारदार पालक शुल्क भारत नाहीत. तसेच तक्रार करण्याची धमकी देतात. आरटीईचा परतावाही चार वर्षांपासून न मिळाल्याने शाळांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे. त्यात आता यापुढील वर्षाचे शुल्कही न आल्यास हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे परिपत्रकात योग्य ते बदल करून इंग्रजी शाळांच्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी वेस्टाकडून शिक्षाणमंत्र्यांना केलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.-------------------------------------

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब आणि शिक्षण मंत्री महोदयांनी खासगी शाळांमधील सक्षम पालकांना शक्य असेल तर नेहमी प्रमाणे फी भरण्यासाठी आवाहन करावे आणि शिक्षकांचा पगाराचा मार्ग मोकळा करावा ही विनंती आहे.

- उदय नरे, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी येथील शिक्षक

टॅग्स :पैसामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस