मुंबई : कोरोना संसर्गाचे प्रमुख केंद्र बनलेल्या तबलीगी जमातच्या दिल्ली येथील मरकज म्हणजेच केंद्रातून धार्मिक संमेलन आटोपून परतलेल्यापैकी अजूनही काही जणांचा शोध सुरु आहे. अशात त्यांनी समोर येवून सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई मुंबई पोलीस आयुक्तांकड़ून करण्यात येत आहे. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मरकज येथे ६४ देशातील २ हजाराहूंन अधिक जणांनी हजेरी लावली होती. यापैकी अनेक जण कोरोनाबाधित असल्याने सर्वांच्याच चिंतेत भर पडली. पोलीस तसेच सबंधित यंत्रणाकडून या व्यक्तीचा शोध घेत त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र अजूनही बरेचसे जण बाहेर येत नाही आहे. त्यात धारावीत कोरोना संसर्गामुळे ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला तेथे पाच महिला तर त्यांचे पती परिसरातील मशिदीत वास्तव्यास होते, अशी माहिती पोलीस आणि पालिका अधिकाº यांना मिळाली. ही पाच दाम्पत्ये मुळची केरळची असून तेथील यंत्रणांनी त्यांचा शोध घेत वैद्यकीय चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे सांगितले जाते. मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणाकडून या व्यक्तिसह त्यांच्या संपर्कत आलेल्यांचाही शोध सुरु आहे.
त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी 'अशा व्यक्तिनी स्वतःहून समोर यावे असे आवाहन ट्वीटद्वारे केले आहे. त्यांना @mybmc च्या १९१६ या हेल्पलाईनवर कॉल करून प्रवासाचा तपशील देण्याबाबत सांगण्यात आले आहे. प्रवासाची माहिती देणे हे तुमचे कर्तव्य आहे. असे न केल्यास आयपीसी, आपत्ती व्यावस्थपान कायदा व साथरोग कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.