गणेश विसर्जन करणाऱ्यांची थकीत देणी मिळाली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 01:58 AM2020-10-04T01:58:31+5:302020-10-04T01:58:42+5:30
स्थानिक शहरी बेघर श्रमिकांनी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी अर्थात सीपीडी या संस्थेकडे संपर्क साधला. तेव्हा संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर व योगेश बोले यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून त्याने कामगारांना दिलेला बेरर धनादेश वटला नाही, असे लक्षात आणून दिले.
मुंबई : गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने कृत्रिम तलावांची निर्मिती खेळाच्या मैदानात केली. याकरिता महापालिका विभाग कार्यालयांनी ठेकेदारांकडून काम करून घेतले; मात्र या ठेकेदाराने ज्या श्रमिकांकडून काम करून घेतले त्यांची देणी देण्यास टाळाटाळ केली. परिणामी याबाबत स्थानिक शहरी बेघर श्रमिकांनी सेंटर फॉर प्रमोटिंग डेमोक्रसी अर्थात सीपीडी या संस्थेकडे संपर्क साधला. तेव्हा संस्थेचे समन्वयक जगदीश पाटणकर व योगेश बोले यांनी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून त्याने कामगारांना दिलेला बेरर धनादेश वटला नाही, असे लक्षात आणून दिले. शिवाय याबाबत कामगार आयुक्तांकडे नोंद करत असल्याचे आणि महापालिका अधिकारी यांच्याकडे तक्रार करीत असल्याचे सांगितले. तेव्हा कुठे कामगारांना थकीत देणी मिळाली.
बोरीवली चिकूवाडी नाल्याच्या बाजूला उघड्यावर अर्थात बेघर म्हणून राहणारे लक्ष्मण काळे व इतर कामगारांद्वारा आर/मध्य बोरीवली वॉर्डमधील पेप्सी ग्राऊंड, योगीनगर आणि चारकोप बीएमसी शाळा येथील मैदानांवर कृत्रिम तलाव बनविण्यात आले. महापालिकेच्या ठेकेदाराने लक्ष्मण काळे यांच्यासोबत मनुष्य कामगार बळ पुरवण्यासाठीच्या कामाकरिता अडीच लाख रुपये व्यवहार ठरविला.
लक्ष्मण काळे आणि इतर कामगारांनी दिवस-रात्र मेहनत घेतली ती दोन पैसे अधिक मिळण्याच्या आशेनेने; मात्र ठरवल्या गेलेल्या रकमेपैकी काम सुरू झाल्यानंतर दहा दिवसाने पन्नास हजार रुपये आगाऊ देण्यात आले. मजुरी मिळत नसल्याने लक्ष्मण काळेकडे कामगार मजुरी मागू लागले. जेव्हा लक्ष्मण काळे ठेकेदाराकडे झालेल्या मजुरीचे पैसे मागू लागताच ठरलेल्या रकमेपैकी कमी मजुरी आणि मजुरीत कपात करू लागला. देणी देण्यास टाळाटाळ करू लागला.
धनादेश मिळाला
सुरुवातीला ठरविण्यात आलेले अंदाजित अडीच लाखाचे काम सरतेशेवटी दोन लाख चार हजार रुपयांना दोघांकडून संमत करून घेण्यात आले. बाकी थकीत देणी प्रथम पन्नास हजारांचा व दुसºया टप्प्यामध्ये एक लाख चार हजारांचा धनादेश ठेकेदाराकडून या श्रमिकांना १ आॅक्टोबर रोजी मिळाला.
हेल्पलाइन द्वारा आधार
लॉकडाऊन पूर्व आणि नंतरच्या काळात अनेक प्रकरणे निदर्शनास दिसून येत आहेत. अशा श्रमिकांच्या न्यायासाठी सीपीडी संस्थेने कामगार आयुक्तालयामध्ये तक्रारवजा निवेदन दिले आहे आणि अशी प्रकरणे शोधून हेल्पलाइनद्वारा आधार मिळवून देण्याचे आवाहन सीपीडी संस्थेचे जगदीश पाटणकर यांनी दिली आहे.