परळी - माझ्यासहीत अनेक आमदारांना गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राला ओळख करुन दिली. गोपीनाथ मुंडे यांनी पाठित खंजीर खुपसण्याचं काम केलं नाही. अनेक छोट्या कार्यकर्त्यांना धरुन त्यांनी मोठं केलं. हम तो डुबेंगे सनम, पर तुमकोभी लेके डुबेंगे असं ते म्हणायचे पण तसं केलं नाही. मी विरोधी पक्षनेता होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रदेशाध्यक्ष करावं म्हणून गोपीनाथ मुंडेंनी नेतृत्वाशी बोलले. मुंडे यांनी घेतलेला निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च होतं. मुंडे असते तर एकनाथ खडसे मुख्यमंत्री झाले असते असं बोललं जातं. पण ज्यांना मोठं केलं, त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं सांगत एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर शरसंधान साधलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष जसा वाढविला. अनेक संघर्ष केला पण जी अवस्था त्यांची होती आज माझी अवस्था आहे. आज माझ्यामागे कोणी नाही, कोण आहे माझ्यामागे? गोपीनाथ मुंडे माझ्या पाठिशी नाही त्याची खंत आहे. जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ असं बोललं जात होतं. आज दुर्दैवाने गोपीनाथ मुंडे नाहीत. सध्यातरी भाजपात मी आहे पक्षाचा आदेश आहे पक्षाविरोधी बोलू नका, पक्षाविरोधात मी बोललो नाही, पक्ष मला प्रिय आहे, पण जे चित्र पक्षाचं महाराष्ट्रात आहे ते लोकांना पसंत नाही, पंकजा मुंडे या सहन करताय त्यांना बोलता येत नाही. गोपीनाथ मुंडे यांचा मतदारसंघ अन् त्यांची मुलगी पराभूत झाली. हे घडलं नाही तर घडवलंय हे सर्वांचे म्हणणं आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच जास्त उघड करणार नाही कारण शिस्तभंगाची कारवाई करतील. माझा गुन्हा काय हे सभागृहात, लोकांसमोर, टीव्हीसमोर सगळीकडे विचारलं तरी उत्तर मिळालं नाही. मग पक्षात जीव गुदमरणार नाही का? पक्षात राहून न्याय मिळत नाही मग काय करणार? माझ्या जीवनात जसा प्रसंग आला, गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनात जसा प्रसंग आला तसा पंकजा मुंडे यांच्या जीवनात येऊ नये, पंकजा मुंडे यांच्या पाठिशी आम्ही सगळे खंबीर आहोत. माझ्याजवळ खूप काही आहे, भरपूर आहे पण बोलायला वेळ नाही असं सांगत इशाराही एकनाथ खडसेंनी दिला.