मुंबई - द्वेष पसरवणारे भाषण करणाऱ्यांना दहशतवाद्यांसारखी वागणूक देऊन शिक्षा व्हावी, महाराष्ट्रात असा कठोर कायदा व्हावा ज्याचा देशावरही परिणाम होईल अशी मागणी महात्मा गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत राज्यव्यापी वज्र निर्धार परिषद घेण्यात आली. यात सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या परिषदेत तुषार गांधी म्हणाले की, महाराष्ट्रात महिलांना असुरक्षित वाटेल असं वातावरण ज्याने बनवलं त्यांना शिक्षा मिळणे गरजेचे आहे. द्वेषपूर्ण समाज बनवला जातोय त्यामुळे हे घडतंय. महाराष्ट्रात द्वेष आणि घृणा पसरवणाऱ्यांविरोधात कठोर कायदा बनवणे आवश्यक आहे. त्या द्वेषपूर्ण भाषणांसाठी आमदारांना विधानसभेत जो विशेषाधिकार मिळतो, जी सुरक्षा मिळते ते हटवली पाहिजे. कुठेही द्वेषाचं भाषण केले तर त्याला दहशतवाद्यासारखी वागणूक देऊन शिक्षा दिली जावी असा कायदा महाराष्ट्रात होणे गरजेचे आहे कारण जेव्हाही महाराष्ट्रात पुरोगामी पाऊल उठलं आहे तेव्हा त्याचा परिणाम देशात झाला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय हरियाणा निवडणुकीनंतर आपल्या सर्वांवर एक जबाबदारी बनते आपण कुठल्याही निवडणुकीला कमी समजू नये. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील जे इतर २ पक्ष होते, त्यांच्या ग्राऊंडवरील कार्यकर्त्यांच्या ताकद कमी दिसली ज्याचा परिणाम दिसून आला. त्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सर्वात मजबुतीने काम करताना दिसून आले त्याचा परिणाम सगळीकडे दिसला. आगामी निवडणुकीत तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी जबाबदारी आहे त्यांनी निवडणुकीच्या दिवशी जी रणनीती असते ती सांभाळण्यासाठी रस्त्यावर यावे असं आवाहनही तुषार गांधींनी केले.
दरम्यान, माझी मातृबोली मराठी आणि पितृबोली गुजराती आहे त्यामुळे दोघांची जबाबदारी आहे. आज महाराष्ट्रात गुजरातींबद्दल फार राग दिसून येत आहे. २ गुजराती ठग जे पाप करून राहिलेत, त्यांच्या कृत्यामुळे पूर्ण समाजाला डाग लागणं बरोबर नाही. त्यामुळे गुजरातींसाठी आणि गुजरातींचं जे महाराष्ट्र प्रेम आहे त्याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी ही कळकळीची विनंती असं तुषार गांधींनी म्हटलं.
अल्पसंख्यांकांना न्याय मिळायला हवा
विशेषत: मुस्लीम समाजाला दुर्लक्षित केले जातेय अशी त्यांची भावना आहे. राजकीय पक्षांकडून त्यांच्या मागणीला प्रतिसाद मिळत नाही असं त्यांना वाटते. ही चूक सुधारायला हवी. महाराष्ट्रात आणि भारतात फक्त मुस्लीम अल्पसंख्याक आहेत असं नाही. इतर जे अल्पसंख्याक आहेत त्यांनाही ते आपले महत्त्वाचे नागरिक आहेत असा विश्वास द्यायला हवा. बापू म्हणायचे, समाजातील शेवटच्या माणसाला न्याय मिळेल, अधिकार भेटेल असं वाटेल तसा समाज आपल्याला बनवायचा आहे. अल्पसंख्याकांवर आपण लक्ष ठेवायला पाहिजे. मुंबई भाषिक अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावरही न्याय व्हायला हवा. त्यांचेही मुंबईसाठी योगदान आहे अशी मागणीही तुषार गांधींनी केली.