महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे - प्रवीण दरेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 08:12 PM2020-10-12T20:12:25+5:302020-10-12T20:13:46+5:30
Pravin Darekar : राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिला.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या मालिका दिवसेंदिवस वाढतच आहेत. सरकारला मात्र याची तसूभरही चिंता नाही. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे. महिलांवरील अत्याचार थांबेपर्यंत आघाडी सरकारला स्वस्थ बसू देणार नाही, अशी घोषणा करत सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपाने मुंबईत दादर चौपाटी ते चैत्यभूमी असा मोठा मोर्चा काढला.
राज्यातील माता भगिनींचा आवाज कुंभकर्णरुपी झोपलेल्या ठाकरे सरकारपर्यंत पोहचविणे व या सरकारला जागे करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले. या सरकारला विद्यार्थ्यांची चिंता नाही, शेतकरी, श्रमिक, दलित, पीडित व्यक्तींची चिंता नाही. या सरकारला महाराष्ट्रातल्या माता-भगिनींचीही चिंता नाही म्हणून शरमेने मान खाली जाते अशी टीका करतानाच महिला अत्याचारांच्या घटना रोखल्या पाहिजेत आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन झालेच पाहिजे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी या मोर्चाच्यावतीने केली आहे.
याचबरोबर, राज्यकर्ते महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना रोखण्यासाठी कडक उपाययोजना करेपर्यंत भाजपा कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी यावेळी दिला. मुंबई येथे शिवाजी पार्क ते चैत्यभूमी असा काढलेल्या मोर्चात खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, आमदार पराग अळवणी, आमदार प्रसाद लाड, आमदार सुनिल राणे,आमदार तमिल सेल्वन, आमदार मनिषा चौधरी, आमदार विद्या ठाकूर, चित्रा वाघ यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.