'ज्यांनी बुलडोझर फिरवून पाप केले त्यांचा हिशोब होणार'; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:00 AM2023-11-08T11:00:19+5:302023-11-08T11:09:29+5:30
खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
मुंबई- ठाण्यात आता पुन्हा एकदा शिवसेनेतील दोन्ही गट आमने- सामने आले आहेत. मुंब्य्रातील शाखा घेण्यावरुन आता दोन्ही गटात वाद सुरू झाला आहे, ती शाखा गुरुवारी रात्री बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आली आहे. आता यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करत राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. तसेच ११ नोव्हेंबर रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देणार असल्याची माहिती दिली.
मणिपूरमध्ये 4 जणांचं अपहरण, सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश; गोळीबारात 7 जण जखमी
संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, 'हे पाप करणारे स्वतःला बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक समजतात. हा शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. शिवसेनेच्या आयत्या शाखा ताब्यात घेणे त्यावर बुलडोझर फिरवून घटनाबाह्य मुखमंत्र्यांचा जय करणे ही विकृती आहे. मुंब्रा येथे शाखेवर बुलडोझर फिरवून ज्यांनी पाप केले त्यांचा हिशोब होईल.हे कसले शिवसैनिक? हा तर कलंक आहे. 11 तारखेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंब्रा शाखेला भेट देत आहेत..तुमच्या बुलडोझर पेक्षा स्वाभिमानी मनगटातील बळ महत्वाचे..हिशोब होईल!', असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. पक्षात दोन पडल्यानंतर आता शाखा ताब्यात घेण्यावरुनही वाद सुरू झाला आहे. याअगोदरही शाखा ताब्यात घेण्यावरुन वाद झाल्याचे समोर आले होते. आता पुन्हा एकदा या कारणावरुन वाद सुरू झाला आहे. मुंब्रा शाखेवरुनही गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. ही शाखा काही दिवसांपूर्वी शिंदे गटाने ताब्यात घेतली होती, आता ती शाखा बुलडोझर लावून जमीनदोस्त केली आहे. यामुळे आता शिवसेनेतील दोन्ही गटात शाखेवरुन वाद सुरू होणार असल्याचे चित्र आहे.