नवी दिल्ली : देशामध्ये मॉब लिंचिंगच्या (झुंडबळी) वाढत्या घटनांविषयी चिंता व्यक्त करणारे खुले पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिणा-या ५० नामवंतांवर गुन्हा दाखल केल्याच्या कृतीचा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे. मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, सध्या देशाचा प्रवास हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. देशात सध्या काय सुरू आहे हे सर्व जण पाहत आहेत. ते काही गुपित राहिलेले नाही. सगळ्या जगाला भारतातील परिस्थिती ठाऊक आहे. केरळमधील वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पत्रकारांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाºयांवर एकतर हल्ले चढविले जातात किंवा त्यांना अटक केली जाते.प्रसारमाध्यमांनाही चिरडण्याचा उद्योग मोदी सरकारने आरंभला आहे. या देशात दोन विचारधारा आहेत. हा देश ‘एक व्यक्ती, एक देश’ या तत्त्वानुसार चालला पाहिजे व कोणीही त्याला विरोध करता कामा नये, अशी एक विचारधारा मानते. मात्र, हे विचार काँग्रेस व विरोधी पक्षांना मान्य नाहीत.भारतामध्ये अनेक मतप्रवाह, भाषा तसेच विविध संस्कृती एकत्र वास करतात. या गोष्टींची गळचेपी होता कामा नये, असे आमचे मत आहे. मॉब लिंचिंगच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त करणारे पत्र पंतप्रधानांना लिहिल्याबद्दल ख्यातनाम इतिहासकार रामचंद्र गुहा, दिग्दर्शक मणिरत्नम, अदूर गोपालकृष्णन, अपर्णा सेन आदी ५० नामवंतांविरोधात बिहारमधील मुझफ्फरपूर येथे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.उपोषणकर्त्यांना दिला पाठिंबाकर्नाटकमधील बांदिपूर व्याघ्र प्रकल्पातून जाणाºया राष्ट्रीय महामार्गावर रात्री वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.त्याविरोधात केरळमधील वायनाड जिल्ह्यातल्या सुल्तान बाथेरी येथे उपोषण करणाºया पाच युवकांची राहुल गांधी यांनी शुक्रवारी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शविला.तसेच हा प्रश्न सोडविण्यासाठी या युवकांना कायदेविषयक मदत देण्याचीही तयारीही राहुल गांधी यांनी दाखविली.वाहतूक मनाईमुळे वायनाडमधील लोकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मोदी सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबले जाते
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 5:01 AM