Join us

पालघरवर बोलणाऱ्यांनी 'खारघर'वर बोलावे, भाजपा समर्थकांवर राष्ट्रवादीचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 3:47 PM

पालघरमधील साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते आणि समर्थकांनी धारेवर धरले होते.

मुंबई - राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने श्रीसदस्य उपस्थित होते. त्यापैकी काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील १२ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यावरून आता ठाकरे गटासह महाविकास आघाडीचे नेते शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या घटनेला पालघर हत्याकांडाशी जोडतं, भाजप समर्थकांना सवाल केला आहे.

पालघरमधील साधूंचं हत्याकांड झाल्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला भाजप नेते आणि समर्थकांनी धारेवर धरले होते. ठाकरेंच्या राज्यात साधू-संत सुरक्षित नसल्याचे सांगत भाजप समर्थकांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. आता, खारघर येथील कार्यक्रमात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीचे नेते व समर्थक आक्रमक झाले आहेत. शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. त्यातूनच, आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप समर्थकांना थेट सवाल केला आहे. तसेच, पालघरवर बोलणाऱ्यांनी आता खारघवर बालावे, असेही मिटकरी यांनी म्हटले आहे.  

राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात जाहीर केली असून उपचार सुरू असलेल्यांचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यावरुनही मिटकरी यांनी सरकारवर निशाणा साधला. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी एवढा खर्च करण्यात आला. पाण्यासारखा पैसा ओतला. मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही, अशी विचारणा अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

सद्गुरु संप्रदाय तुम्हाला माफ करणार नाही केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळले नाही का? मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकले आहे. या घटनेचे राजकारण करू नये म्हणून सांगितले गेले. राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही. पण शिंदे साहेब, एवढी माणसे मृत्यू पावत असतील तर सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे सांगत या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.  

टॅग्स :अमोल मिटकरीएकनाथ शिंदेमुंबई