गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांवरून बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. यातच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा कार्यक्रम मुंबईत होत आहे. बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला काँग्रेस, मनसेसह अनेकांनी विरोध दर्शवला होता. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना एक आव्हानही देण्यात आलं होतं. यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी विरोधकांवर निशाणा साधला. मुंबईच्या नजीक असलेल्या मीरारोड परिसरात त्यांचा दरबार भरवण्यात आला आहे. दरम्यान, आपल्याला कोणालाही पुरावा देण्याची गरज नाही, ज्यांना पुरावा हवाय त्यांनी दरबारात या असं आव्हान त्यांनी विरोधकांना दिलंय.
“कोणीही अंधश्रद्धेला बळी पडू नये. परंतु आपल्याला कोणालाही पुरावे देण्याची गरज नाही. ज्यांना आपल्यापासून समस्या आहे, त्यांनी येऊन पुरावा घ्यावा. ज्यांना गरज आहे, त्यांनी यावं आम्ही मलम लावू, पॅरासिटॅमॉलची गोळी देऊ,” असं धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. “त्यांनी पहिले माझ्या भक्तांचा सामना करावा. संपूर्ण भारत आमचा आहे. आम्ही लोकांना शिक्षित करून सनातनशी जोडूनच राहू. भारतातील मंत्र आणि भारतातील ऋषि मुनींमध्ये किती ताकद आहे, हे आम्ही त्यांना सांगू,” असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या दरबारात जय सितारामसह छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही दिल्या.
“जर आपला कोणी विरोध करत असेल, तर तुम्ही मन दुखावून घेऊ नका. प्रभू श्रीराम होते तर रावणाच्या कुटुंबातील लोकही होते. आपण महाराष्ट्रात येऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले गेले. परंतु आता आपण पुन्हा मुंबईत येऊ आणि जोपर्यंत जीवंत आहोत तोपर्यंत येत राहू,” असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. “ज्यांनी आम्हाला विरोध केला त्यांचेही धन्यवाद. जर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबवू इच्छित आहात, तर एक आठवडा नक्की देऊ, परंतु धर्माला विरोध करणाऱ्याची सुट्टी करून. भारत हिंदू राष्ट्र नक्कीच बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
… त्यांनी समोर यावंआपल्याला विरोध करणाऱ्यांनी येऊन अर्ज करावा. आपण प्रत्येक गोष्टी सांगू. ज्याला आपल्यात ढोंगीपणा दिसतो त्यानं आपल्यासमोर यावं. ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. आपण स्वत:साठी बोलत नसून येणाऱ्या पिढीसाठी बोलत आहेत. जेणेकरून कोणीही मंदिरावर दगडफेकही करू शकणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. दरम्यान, यावेळी ठाण्यात बागेश्वर धाम मंदिर उभारलं जाणार असल्याचं ते म्हणाले.