‘त्या’ महिलांच्या वेदना कमी होणार; ७० टक्के महिलांना केमो टाळता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 04:18 AM2018-08-03T04:18:48+5:302018-08-03T04:18:55+5:30
स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुमारे ७० टक्के महिलांना केमोथेरपीच्या वेदना टाळता येणार असल्याचा दावा ट्रायल असाइनिंग इंडिव्हिज्युअलाईज्ड आॅप्शन फॉर ट्रीटमेंटच्या निष्कर्षात करण्यात आला आहे.
मुंबई : स्तनाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सुमारे ७० टक्के महिलांना केमोथेरपीच्या वेदना टाळता येणार असल्याचा दावा ट्रायल असाइनिंग इंडिव्हिज्युअलाईज्ड आॅप्शन फॉर ट्रीटमेंटच्या निष्कर्षात करण्यात आला आहे. आॅन्कोटाइप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स स्कोअर टेस्टच्या माध्यमातून रुग्णांना केमोथेरपीची आवश्यकता आहे की नाही हे ठरविता येणार आहे. टेलोरेक्सने केलेल्या सर्वेक्षणात या टेस्टमुळे सुमारे ७० टक्के महिलांना केमोथेरपीचे उपचार टाळता आले आहेत, अशी माहिती संस्थेने मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
सर्जिकल आॅन्कोलॉजिस्ट डॉ. विनय देशमाने यांनी सांगितले, या चाचणीमुळे स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांना केमोथेरपीचा सल्ला देण्याबाबत मोठे बदल होणार आहेत. आॅन्कोटाइप डीएक्स चाचणीमुळे कर्करोगाच्या धोक्याची तीव्रता लक्षात येते. त्यामुळे केमोथेरपी द्यायची की टाळायची? याचा निर्णय घेण्यासाठी आॅन्कोलॉजिस्टला या चाचणीची मदत होणार आहे. परिणामी, केमोथेरपीचा वापर कमी होऊन रुग्णांना होणाऱ्या वेदना कमी होतील, असा दावाही देशमाने यांनी केला आहे.
स्तनाचा कर्करोग निदान झालेल्या बहुतेक रुग्णांमध्ये हार्मोन-पॉझिटिव्ह, एचईआर२-निगेटिव्ह, नोड-निगेटिव्ह कर्करोग असतो. यापैकी सुमारे ७० टक्के रुग्णांना केमोथेरपी दिली नाही तरी चालेल, असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे, असेही विनय देशमाने यांनी या वेळी सांगितले.
९ वर्षे केली पाहणी
टेलोरेक्समधील प्राथमिक पाहणी गटातील आॅन्कोटाइप डीएक्स ब्रेस्ट रिकरन्स रिझल्ट ११ ते २५ असलेल्या ६ हजार ७११ महिलांना केमोथेरपीसह किंवा केमोथेरपीविना सरसकट इंडोक्रिन थेरपी देण्यात आली. सर्वेक्षणातील एकूण रुग्णांपैकी दोन-तृतीयांश रुग्णांचा त्यात समावेश होता. त्यानंतर अभ्यासकांनी सुमारे ९ वर्षे रुग्णांचा पाठपुरावा केला आहे.