डिसेंबर मध्यावर आला तरी महाराष्ट्र थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 05:23 AM2019-12-14T05:23:04+5:302019-12-14T06:00:51+5:30
महाराष्ट्रात बहुतांश शहरे थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
मुंबई : मुंबईचे किमान तापमान शुक्रवारी १९.५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, या मोसमातले आतापर्यंतचे हे नीचांकी किमान तापमान असल्याची नोंद भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली. तर राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. सर्वसाधारणपणे या काळात महाराष्ट्रातील बहुतांशी शहरे गारठतात किंवा कडाक्याची थंडी पडते. मात्र या वेळी डिसेंबर मध्यावर आला तरी महाराष्ट्रात बहुतांश शहरे थंडीचा कडाका वाढण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल नोंदविण्यात येत आहेत. राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यात आता १४ डिसेंबर रोजीही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईचा विचार करता माझगाव, दादर, बीकेसी, सांताक्रुझ, गोरेगाव, मालाड, कांदिवली, चारकोप, आकुर्ली रोड, बोरीवली, चेंबूर, विद्याविहार, घाटकोपर, पवई, जोगेश्वरी, भांडुप, मुलुंड येथील किमान तापमान २० अंशाच्या आसपास नोंदविण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरातील किमान तापमानात घसरण नोंदविण्यात येत आहे. विशेषत: आरे कॉलनी परिसरासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरातील किमान तापमानात घट नोंदविण्यात येत आहे. उर्वरित ठिकाणांवरील किमान तापमान खाली घसरत असले तरी ही नोंद २० अंशावरच आहे. परिणामी, मुंबईकरांना पहाटेच्या वेळी थंडीचा किमान अनुभव घेता येत असला तरी प्रत्यक्षात म्हणावा तसा गारवा अद्यापही पडलेला नाही.
येथे पडणार पाऊस
१४ डिसेंबर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. कोकण, गोव्यात हवामान कोरडे राहील. विदर्भात तुरळक ठिकाणी दाट धुके राहील.
काही शहर-उपनगरातील किमान तापमान
मालाड १९.१०
चारकोप १९.२१
चेंबूर १७.२३
पवई १७.८८
मुलुंड १९.१७
नेरूळ १९.४९
पनवेल १६.९८
(अंश सेल्सिअस)
राज्यातील शुक्रवारचे किमान तापमान
पुणे १५.९
जळगाव १६
महाबळेश्वर १३.५
मालेगाव १५.४
नाशिक १२.६
सातारा १६.८
नांदेड १६
अमरावती १६.२
बुलडाणा १६.४
गोंदिया १६.८
वाशिम १६
(अंश सेल्सिअस)
नाशिक १२.६ अंश सेल्सिअस
राज्यात शुक्रवारी सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १२.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. तर थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचे किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस एवढे होते.