Join us

कोंबडा आरवला नाही तरी सकाळ होतेच, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:03 AM

'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ठळक मुद्देशरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल.

मुंबई - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि इतरही मंत्री दौरे करत आहेत. या दौऱ्यावरुन आता राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. फडणवीसांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर देताना फडणवीसांना टोला लगावला.

'कोंबडा आरवला किंवा नाही आरवला तरी सकाळ व्हायची थांबत नाही. आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्या कोंबड्यासारखीच अवस्था झाली आहे', अशी बोचरी टीका नवाब मलिक यांनी केली आहे. माझ्यामुळे इतर पक्षाचे लोक बाहेर फिरायला लागले अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. फडणवीसांच्या या टीकेला मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. कोंबडयाला वाटतं की मी आरवलो नाही तर सकाळ होणारच नाही, पण प्रत्यक्षात तसं काहीही नसतं. कोंबडा झोपला तरी सकाळ होते, हे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवे, असा टोमणा मलिक यांनी लगावला. तसेच, शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात कॅबिनेट बैठकीचा मदतीचा निर्णय होईल, असेही मलिक म्हणाले. 

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही सरकारकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनीही पाहणी दौरा केला असून निश्चितच राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची भूमिका महाराष्ट्र सरकारची राहिल, सरकार नक्कीच मदत जाहीर करेल. केंद्र सरकारनेही मदत करण्याची जबाबदारी घ्यावी, राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये मदतीसाठी निर्णय घेतला जाईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. 

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर थिल्लर टीका

लोकांना काय मदत करणार हे महत्त्वाचे आहे. अशा प्रकारच्या गंभीर दौर्‍यात थिल्लर स्टेटमेंट करणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. लोकांना मदत करण्याची यांच्यात हिम्मत नाही. मुख्यमंत्री दोन तीन तासाचा प्रवास करून थोड्या काळासाठी बाहेर पडले आहेत. यावेळी लोकांनी त्यांना काय प्रतिसाद दिला माहीतच आहे. अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी केली. मुख्यमंत्री फक्त टोलवाटोलवी करत आहेत. काहीही झाले की केंद्राकडे बोट दाखवायचे. तुमच्यात हिंमत नाही का? आम्ही सत्तेत असताना १० हजार कोटीची मदत लोकांना दिली होती. यांना मदत करायची नाही. राज्याला १ लाख 20 हजार कोटी कर्ज काढण्याची क्षमता दिलेली आहे. हे फक्त लोकांची दिशाभूल करतात.

टॅग्स :मुंबईनवाब मलिकदेवेंद्र फडणवीसपूरपाऊसशेतकरी