ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - भाजपा आणि शिवसेनेमध्ये कधीकधी कुरबुरी होत असतात, मात्र शिवसेनेसोबत पाच वर्ष गुण्यागोविंदाने सरकार चालवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच जर का शिवसेनेने साथ सोडली तर अनेक अदृश्य हात सरकार वाचवण्यासाठी आहेत असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. "अनेक अदृश्य हात मदतीसाठी वेळोवेळी पुढे सरसावत असतात त्यामुळे राज्यात कोणताही भुकंप होणार नाही. तसंच या सरकारला कोणताही धोका नाही", असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. एबीपी माझाच्या "व्हिजन पुढच्या दशकाचं" या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विषयावर मोकळेपणाने आपली मतं मांडली. महाराष्टाचा विचार केल्यास देशाचं पॉवर हाऊस किंवा इंजिन म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं असं त्यांनी यावेळी सांगितलं. शेतीवर बोलताना त्यांनी सांगितलं की, "शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे, तसंच शाश्वत शेतीसाठी पाण्याचं नियोजन आवश्यक आहे. गटशेतीचा प्रयोग राज्यात राबवण्याची गरज असून शेती आणि उद्योगाची सांगड घालण्याचा प्रयत्न करत आहे".
महाराष्ट्रानं उद्योग क्षेत्रातील अढळपद पुन्हा मिळवलं असल्याचं सांगताना उद्योग क्षेत्रात दिल्लीपेक्षा महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी गुंतवणूक हवी असल्याचंही ते यावेळी बोलले आहेत. शेतीमधील गुंतवणूक पुढील दोन वर्षात वाढवू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्जमाफीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलले की, "कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण येणार, पण विकासकामांसाठी वेगळा प्लॅन तयार आहे". तसंच शेतक-यांसाठी आपण कोणाशीही चर्चा करायला तयार असून चर्चेने कमीपण येत नाही, कोणी लहान होत नाही आणि कोणी मोठंही होत नाही असं ते बोलले आहेत.
समृद्धी महामार्गावरुन सुरु असलेल्या आंदोलनावर बोलताना त्यांनी सांगितलं की, "शेतक-याची शेती न जाता झाला असा एक प्रोजेक्ट दाखवा. देशात आजपर्यंत देण्यात आलेली नाही इतकी नुकसानभरपाई आम्ही शेतक-यांना देत आहोत. आम्ही शेतक-यांवर जबरदस्ती केलेली नाही. अनेकजण आमच्यासोबत आहेत. शेतक-यांशी संवाद केल्यानंतर जमीन मिळवणार आहोत". काहींच्या जमिनी नसतानाही शेतकरी नेते म्हणून आंदोलन करत आहेत असा टोलाही त्यांना यावेळी लगावला. सोबतच सामंजस्य करारांचं प्रत्यक्षात रुपांतर करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी असून हा टक्काक गुजरात, कर्नाटकपेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं.
दिल्लीला जाण्यासंबंधी प्रश्न विचारला असता, "ज्या दिवशी माध्यमांमध्ये बातम्या नसतात तेव्हा मी दिल्लीला जeणार असल्याच्या बातम्या देत असतात. माझा आणि माझ्या पक्षाचा असा कोणताही विचार नाही", असं मिश्किल उत्तर त्यांनी दिलं.