दिमतीला एसी वाहने असली तरी प्रचारात उमेदवाराला घाम फुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 02:26 AM2019-04-12T02:26:44+5:302019-04-12T02:26:47+5:30
सूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : उघड्यावरील पदार्थ नको, पाणी प्या, सुती कपडे वापरा
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणारे तापमान लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना बेजार करत आहे. शहर-उपनगरात फिरताना आग ओकणारा सूर्य, शरीरातून वाहणाºया घामाच्या धारा, सतत पाणी पिण्याने मारली जाणारी भूक, रणरणत्या उन्हात व फॅनमधून येणाºया गरम वाºयात कराव्या लागणाºया प्रचाराचे मोठे आव्हान उमेदवारांसमोर आहे.
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला सुरुवात झाली आहे, अशावेळी प्रचार रॅली, सभा, बैठका अशा साऱ्यांची घाई उडणार आहे. मार्च व एप्रिल हे दोन महिने आपल्याकडे कडक उन्हाळ्याचे म्हणून ओळखले जातात. उन्हाचा कडाका कसा असू शकतो याची झलक पाहायला मिळाली आहे. गेल्या उन्हाळ्यात ३२ अंशाचा टप्पा पार केला होता. अशा कडाक्याच्या उन्हात प्रचार फिरण्यासाठी उमेदवारांच्या दिमतीला एसी असलेली वाहने असली तरी प्रचारात त्यांचा घाम निघणारच आहे.
स्थानिक कार्यकर्त्यांनी मतदारसंघात जाऊन घराघरांत प्रचार सुरू केला आहे, मात्र अशा वातावरणात होणारी दमछाक थांबविण्यासाठी आहारावर लक्ष दिले पाहिजे.
उन्हात फिरत असताना मुख्यत: पाणी आणि आहारावर लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून, उन्हात फिरताना प्रतिकारक शक्ती कायम राखता येईल. विशेष म्हणजे नियमित आणि मुबलक पाणी प्यायला हवे. याखेरीज, ताज्या फळांचा रस, ग्लुकोज, व्हिटॅमिन सी असलेल्या पेयांचे सेवन केले पाहिजे. उन्हाचा त्रास टाळण्यासाठी उघड्यावरील पेये, कोल्ड ड्रिंक्स टाळायला पाहिजे. उन्हाळ्यात घाईघाईने पदार्थ बनविले जातात. ते अशुद्धच असतात. असे अन्न पोटात गेले तर वेगवेगळ्या आजारांना ते निमंत्रणच ठरते. यात अतिसार, उलट्या होणे, पोट बिघडणे, ताप येणे यांचा समावेश असतो.
- डॉ. जयेश लेले,
इंडियन मेडिकल असोसिएशन
डायरिया, अतिसार, घामोळी, पोटाचे विकार हमखास डोके वर काढतात. बाहेरच्या खाण्यामुळे पोटात इन्फेक्शन होते आणि उन्हाळ्याचे आजार बळावतात. पोटाचा संसर्ग म्हणजे गॅस्ट्रो यात रुग्णाला सतत उलट्या होतात, शौचाला होते, पोट दुखते आणि काहीवेळा अंगही दुखू लागते आणि ताप येतो. यात साधारणपणे उलटी आणि अतिसार दोन्ही होतात. ही स्थिती जास्त धोक्याची असते. त्यातच जंक फूड आणि फास्ट फूड लोकांचा दिनक्रम बनला आहे. हे बाहेरचे खाणे जास्त तेलकट आणि जास्त कॅलरीयुक्त असते. त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होतात, त्यामुळे या दिवसांत स्वास्थ्याची विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.