मुंबई - पालिका शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संगणक, आधुनिक तंत्रज्ञान यांचा वापर करून त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, यासाठी महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी २५ शाळांमध्ये विचारशील प्रयोगशाळा स्थापन करून त्यातील इलेक्ट्रिक व मेकॅनिकल साहित्याचे परिरक्षण करण्यात येणार आहे. या उपक्रमाकरिता पालिकेमार्फत तीन कोटी ४८ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या निती आयोगाद्वारे २०१७ पासून पालिकेच्या निवडक माध्यमिक शाळांमधून ‘अटल विचारशील प्रयोगशाळा’ स्थापन करण्यात आल्या. पालिकेच्या ‘ए’ विभागातील कुलाबा पालिका माध्यमिक शाळेमध्ये या प्रकल्पाअंतर्गत ‘अटल विचारशील प्रयोगशाळा’ स्थापन करण्यात आली. तसेच, २०१८-१९ मध्ये पालिकेच्या गुंदवली एमपीएस शाळा, पाली चिंबई पालिका शाळा आणि गोवंडी स्टेशन पालिका शाळा या तीन शाळांमध्ये या प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या आहेत.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य
पालिकेच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, जिज्ञासा, प्रयोगशील विचार करण्याची क्षमता, इत्यादी विकसित करण्याची संधी देणे, आधुनिक माहिती-तंत्रज्ञान संबंधित साधनांचा प्रत्यक्ष वापर करणे, संगणक आज्ञावलीच्या कार्यपद्धतीची माहितीबाबतचे ज्ञान व अनुभव आणि त्यांद्वारे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्देश आहेत.