अनारक्षित तिकिटे देण्याचा विचार
By Admin | Published: October 3, 2015 03:06 AM2015-10-03T03:06:31+5:302015-10-03T03:06:31+5:30
तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून मुंबईतील उपनरीय प्रवाशांसाठी मोबाइल तिकिट सेवा आणण्यात आली. यात पश्चिम रेल्वेवर मोबाइल पेपरलेस तिकीट
मुंबई : तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी रेल्वेकडून मुंबईतील उपनरीय प्रवाशांसाठी मोबाइल तिकिट सेवा आणण्यात आली. यात पश्चिम रेल्वेवर मोबाइल पेपरलेस तिकीट सुविधाही सुरू केल्यानंतर आता मध्य रेल्वेवर ती सुरू केली जाणार आहे. यात आणखी काही बदल करता येतील का यावर रेल्वेच्या क्रिस संस्थेकडून विचार केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्यांची अनारक्षित तिकिटेही देता येऊ शकतात का याचा विचार केला जात असल्याचे सांगण्यात आले.
पश्चिम रेल्वेवर मोबाइल तिकीट सेवा काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आली. यात प्रवाशांना मोबाइलवर तिकीट उपलब्ध झाल्यानंतर त्याची प्रिंट स्थानकांवरील एटीव्हीएममार्फत घ्यावी लागते. ही सेवा सुरू झाल्यानंतरही अद्याप त्याला भरघोस प्रतिसाद मिळालेला नाही. यात बदल करत पेपरलेस मोबाइल तिकीट सुविधा सुरू करण्यात आली. मोबाइलवर आलेले तिकीट यात ग्राह्य धरण्यात येते. मात्र ही नवीन सुविधा सुरू झाल्यानंतरही दिवसाला फक्त ५00 तिकिटांची विक्री यातून होत आहे. मध्य रेल्वेमार्गावरही मोबाइल तिकीट सेवा सुरू करण्यात आल्यानंतर ७ सप्टेंबरपासून पेपरलेस तिकीट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर काम करणाऱ्या रेल्वेच्या क्रिस संस्थेचे महाव्यवस्थापक उदय बोभाटे यांनी सांगितले की, या सेवांना सध्या फारच कमी प्रतिसाद आहे. त्याचे कारण समजत नसून त्यासाठी सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्रही देण्यात आले असून, एक सर्वेक्षण करून प्रवाशांचे मत आणि त्यांच्या सूचना घेण्यात याव्यात अशी मागणी केली गेली आहे.