विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांवर तिसरा डोळा, एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 03:21 AM2020-01-22T03:21:11+5:302020-01-22T03:22:56+5:30

पालिका शाळांमध्ये गेल्या काही घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Thousand CCTV cameras on the schools for the safety of the students | विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांवर तिसरा डोळा, एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पालिका शाळांवर तिसरा डोळा, एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

Next

मुंबई : पालिका शाळांमध्ये गेल्या काही घटनांमुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचे तीव्र पडसाद शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी उमटले. त्यानंतर, पालिकेच्या ५२० शाळा इमारतींचे प्रवेशद्वार व बाहेर पडण्याच्या मार्गावर, तसेच चौथी ते सातवीच्या वर्गांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. यासाठी लवकरच निविदा प्रक्रियाही सुरू करणार असल्याचे सहआयुक्त आशुतोष सलील यांनी सांगितले. 

मालवणी येथील एका मान्यताप्राप्त शाळेविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे़ तरीही पालिकेने संबंधित शाळा व्यवस्थापनावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे शिवसेनेच्या नगरसेविका शुभदा गुढेकर यांनी शिक्षण समितीच्या निदर्शनास आणले. याबाबत पालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. अशा शाळांना मान्यता देताना विद्यार्थिनींच्या सुरक्षेवरही लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

वांद्रेच्या खेरवाडी पालिका शाळेतील एका शिक्षकाकडून सर्व शिक्षकांना अश्लील मेसेज, फोटो पाठविले जात असल्याची बाब शिवसेनेचे मंगेश सातमकर यांनी निदर्शनास आणली़ याबाबत कारवाई करण्याची मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशा घटना वारंवार घडत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या, याबाबत माहिती देण्याची मागणी सर्वपक्षीय सदस्यांनी केली. 

आदित्य ठाकरेंनी घेतली दखल
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून पालिका शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली असल्याचे सदस्य साईनाथ दुर्गे यांनी निदर्शनास आणले. याबाबत माहिती देताना पालिका शाळांमध्ये लवकरच सीसीटीव्ही बसविण्यात येणार असल्याचे सहआयुक्त सलील यांनी सांगितले़

इंग्रजीतून सादरीकरण बंद
शाळा पायाभूत कक्षामार्फत शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी सादरीकरण करण्यात आले़ मात्र, हे सादरीकरण इंग्रजीतून असल्यामुळे शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी पुढील बैठकीत हेच सादरीकरण मराठीतून करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले़

महापालिकेच्या सुमारे ९८१ शाळांमध्ये दोन लाख ७१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
महापालिकेच्या स्वत:च्या ४५८ इमारती असून, ६२ खासगी इमारतींत शाळेचे वर्ग भरविण्यात येतात. यामध्ये पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.
सर्व पालिका शाळांच्या एन्ट्री-एक्सिट आणि चौथी ते सातवीच्या वर्गांत सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत़
मालवणी आणि वांद्रे येथील पालिका शाळांमध्ये घडलेल्या प्रकारांची माहिती घेऊन लवकरच कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
 

Web Title: Thousand CCTV cameras on the schools for the safety of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.